इराण चवताळला! इस्रायलला साथ देणाऱ्या फ्रान्सच्या नौदल तळावर अन् ब्रिटीश एअरबेसवर मोठा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 11:39 IST2026-03-02T11:31:55+5:302026-03-02T11:39:42+5:30
इराणने सायप्रस येथील ब्रिटीश हवाई दलाच्या एअरबेसवर हल्ला केला आहे.

इराण चवताळला! इस्रायलला साथ देणाऱ्या फ्रान्सच्या नौदल तळावर अन् ब्रिटीश एअरबेसवर मोठा हल्ला
तेहरान - अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर इराणने आक्रमक भूमिका घेत कुवैत, अबू धाबीसह इतर देशांमध्येही हल्ले केले. इराणने अमेरिकन सैन्य तळांना टार्गेट करत हल्ले केले आहेत. ज्यामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत संघर्ष वाढला आहे. इराण कुठल्याही स्थितीत माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांच्या आक्रमक हल्ल्यातून दिसत आहे. इराणच्या जामकरान मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आला आहे. इराण सातत्याने अमेरिकेच्या सैन्य तळांना टार्गेट करत आहे. इराणच्या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेतील अनेक देशांनी त्यांचे एअरस्पेस बंद केलेत. त्यातच अमेरिका इस्रायलच्या मदतीला येणाऱ्या फ्रान्स, बिटनलाही इराणच्या रागाला सामोरे जावे लागत आहे.
इराणने सायप्रस येथील ब्रिटीश हवाई दलाच्या एअरबेसवर हल्ला केला आहे. सायप्रसचे राष्ट्रपती म्हणाले की, ब्रिटीश हवाई दलाचे अक्ट्रिटिरी एअरबेसवर शाहिद ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याने मध्य पूर्व आणि युरोपच्या सुरक्षेवरही गंभीर चिंता निर्माण झाली आहे. अक्ट्रिटिरी एअरबेस हा सायप्रसमध्ये बनवण्यात आला आहे. हा एअरबेस ब्रिटनच्या सर्वात महत्त्वपूर्ण सैन्य संपत्तींपैकी एक आहे. प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
BREAKING: RAF base in Cyprus hit by suspected drone strike, Ministry of Defence says
— Sky News (@SkyNews) March 2, 2026
Read more🔗https://t.co/9etSo1FPUC
तर दुसरीकडे अबू धाबी येथील फ्रान्सच्या नौदल तळावरही इराणने हल्ला केला आहे. या हल्ल्यात नौदल तळावरील एका हँगरचे मोठे नुकसान झाले अशी माहिती फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली आहे. त्याशिवाय इराणने डागलेल्या मिसाइल आणि ड्रोन हल्ले बहरीन येथे तैनात जवळपास ३०० ब्रिटीश सैन्य कर्मचाऱ्यांच्या जवळ झाले आहेत. हा हल्ला काहीच अंतरावर होता त्यामुळे ब्रिटीश सैन्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असं ब्रिटीश संरक्षणमंत्री जॉन हीली यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, इराणकडून सातत्याने होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची गंभीर दखल घेत ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनी अमेरिकेसोबत मिळून काम करण्याची तयारी दर्शवली होती. इराणचे 'बेजबाबदार' मिसाईल, ड्रोन हल्ले रोखण्यासाठी आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे तिन्ही देश अमेरिका इस्रायलसोबत इराणविरोधात सैन्य कारवाईत सहभागी होऊ शकतात असा इशारा तिन्ही देशांनी दिला होता. त्यानंतर इराणने फ्रान्स, ब्रिटन या देशांच्या सैन्य तळांवर हल्ला केला आहे.