युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 09:46 IST2025-09-15T09:46:09+5:302025-09-15T09:46:38+5:30
दरम्यान, युरोप हद्दीत या घडामोडी सुरू असताना रविवारी युक्रेनने रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला केला आहे.

युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
मास्को/किव्ह : युक्रेन युद्धाची व्याप्ती आता युरोपात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशियन ड्रोननी पोलंडमध्ये घुसखोरी केल्यानंतर रशियाचे मित्रराष्ट्र असलेल्या बेलारूस सीमेवर प्रचंड तणाव आहे. पोलंडने या सीमेवर ४० हजार सैनिक तैनात करून रसद वाढवली असताना रशियन ड्रोन आता रोमानियात घुसले आहेत. दरम्यान, युरोप हद्दीत या घडामोडी सुरू असताना रविवारी युक्रेनने रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला केला आहे.
रशियाच्या संभाव्य हल्ल्यामुळे रोमानिया प्रचंड धास्तावले असून, काही ड्रोननी आपल्या हवाई हद्दीत १० किमी अंतरापर्यंत घुसखोरी केल्याच्या वृत्ताला रोमानियाच्या संरक्षण मंत्रालयाने पुष्टी दिली आहे. रशियाने पोलंड सीमेवर बेलारूसमध्ये संयुक्त युद्धसराव सुरू केला असून, यामुळे अख्खा युरोप धास्तावला आहे. फ्रान्सने आपली युद्ध विमाने पोलंडमध्ये तैनात केली आहेत.
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
फ्रान्स-जर्मनीसह नाटो देश सतर्क
या युद्धाची व्याप्ती आता युरोपात वाढत चालल्याने ‘नाटो’ सदस्य देश सतर्क झाले असून, फ्रान्स-जर्मनीसह इतर देशांनी संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पोलंडने आपले एक विमानतळ बंद केले असून, काही रशियन ड्रोन पाडल्याचा या देशाचा दावा आहे. (वृत्तसंस्था)
तेल खरेदी बंद करा
ट्रम्प यांनी नाटो देशांनी रशियाकडून इंधन तेलाची खरेदी पूर्णपणे बंद करावी, असे आवाहन केले आहे. या तेल खरेदीत चीन व भारत आघाडीवर असून, यानंतर ‘नाटो’चा सदस्य असलेला तुर्की सर्वांत मोठा खरेदीदार आहे.
पुतिन यांचे महाअस्त्र
बेलारूससोबत सुरू असलेल्या युद्धसरावात रशियाने आपल्या भात्यातील ‘जिरकॉन’ क्षेपणास्त्रे आणि युद्धक ‘एसयू-३४’ बॉम्बर्सचे शक्तिप्रदर्शन केल्याने युरोप हादरला आहे. आवाजाच्या ९ पट वेगाने हल्ले करणाऱ्या आण्विक क्षेपणास्त्रांच्या कवायतीने अनेक देशांत भयकंप आहे.
...आता माघार नाहीच
रशियाने बेलारूसमध्ये सुखोई-३४ विमानांच्या करामती दाखवून आता कोणत्याही परिस्थितीत युद्धातून माघार घ्यायची नाही, हा संदेशच एकप्रकारे अमेरिका व युरोपला दिला आहे.
रशियन ‘जिरकॉन’ भयंकरच
युद्धसरावात रशियाने जिरकॉन क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेऊन दिलेला इशारा म्हणजे रशियाच्या गेम चेंजर धोरणाचा एक भाग आहे. आवाजाच्या नऊ पट वेगाने हल्ला करणारी ही क्षेपणास्त्रे ३०० ते ४०० किलो वॉरहेड वाहून नेऊ शकतात. याची मारक क्षमताही ४०० ते १००० किमी एवढी प्रचंड आहे.