युरोपला जाताच झेलेन्स्कींना कळून चुकले; अमेरिकेशी खनिज डील करण्यास तयार झाले, पण... या अटी घातल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 08:07 IST2025-03-03T08:06:05+5:302025-03-03T08:07:39+5:30
Zelensky Vs Trump: युक्रेनी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भर पत्रकार परिषदेत हुज्जत घातली होती.

युरोपला जाताच झेलेन्स्कींना कळून चुकले; अमेरिकेशी खनिज डील करण्यास तयार झाले, पण... या अटी घातल्या...
अमेरिका आणि नाटो देशांच्या जिवावर गेली तीन वर्षे रशियाविरोधात युद्ध लढत असलेल्या युक्रेनी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भर पत्रकार परिषदेत हुज्जत घातली होती. यावेळी ट्रम्प यांनी युक्रेनमधील दुर्मिळ मिनरल्स द्या तरच मदत पुढे सुरु ठेवू असे बजावले होते. यानंतर झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसबाहेर जाण्यास सांगण्यात आले होते. आता युरोपला जाताच झेलेन्स्की यांनी काहीशी मवाळ भूमिका घेतली आहे.
अमेरिकेने युक्रेनवर मोठा पैसा खर्च केला आहे. हा करदात्यांचा पैसा आहे, त्या बदल्यात आम्हाला युक्रेनमधील खनिजांचे भांडार मिळावे असा प्रस्ताव ट्रम्प यांनी ठेवला होता. परंतू, त्यास झेलेन्स्की यांनी नकार दिला होता. हा वाद पत्रकार परिषदेतच झाला होता. यावरून अमेरिका आता युक्रेनचा पाठिंबा काढून घेणार व रशिया युक्रेन जिंकणार का, असा सवाल उपस्थित होत होता. अखेरीस झेलेन्स्की यांनी युरोपच्या दौऱ्यावेळी आपण अमेरिकेशी डील करण्यास तयार असल्याची भुमिका घेतली आहे.
अमेरिकेच्या मुत्सद्द्यांनी झेलेन्स्की यांनी एकतर डील स्वीकारावी किंवा पदाचा राजीनामा द्यावा असा दबाव आणला होता. ट्रम्प यांनी अमेरिका यु्क्रेनला असलेला पाठिंबा काढून घेणार असल्याचे व युक्रेन हरणार असल्याचा इशारा दिला होता. या वादळी भेटीनंतर झेलेन्स्की युरोपच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ट्रम्प यांच्यासोबत संबंध सुधारण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. परंतू, चर्चा बंद खोलीमध्ये करण्याची गरज आहे. जर आम्हाला सुरक्षेची हमी मिळाली आणि युक्रेनला नाटोचे सदस्यत्व मिळाले तर मी पदही सोडण्यास तयार असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
याचबरोबर झेलेन्स्की यांनी काही अटी देखील ठेवल्या आहेत. रशियासोबतच्या शांतता करारात युक्रेन आपला प्रदेश सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. रविवारी ब्रिटीश माध्यमांना ही माहिती दिली आणि सोशल मीडिया पोस्टमध्येही त्याचा पुनरुच्चार केला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की गेल्या शुक्रवारी खनिज करार करारावर स्वाक्षरी करण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये गेले होते. परंतू, तिथे वाद झाल्याने या करारावर स्वाक्षरी झाली नव्हती.