झेलेन्स्कींच्या पदरी निराशा; ट्रम्प यांच्याशी वादानंतर ब्रिटनमध्ये युक्रेन युद्धाबद्दल भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 06:18 IST2025-03-02T06:15:56+5:302025-03-02T06:18:07+5:30
अमेरिकेने युक्रेनला मदत केली नसती, तर हे युद्ध कधीच संपले असते, अशा शब्दांत ट्रम्प यांनी अपमान केल्यामुळे संतापलेले झेलेन्स्की बैठकीतून उठले व व्हाइट हाऊसमधून निघून गेले.

झेलेन्स्कींच्या पदरी निराशा; ट्रम्प यांच्याशी वादानंतर ब्रिटनमध्ये युक्रेन युद्धाबद्दल भूमिका
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वॉशिंग्टनमध्ये झालेल्या वादानंतर निराशा पदरी आलेले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की तिथून ब्रिटनमध्ये शिखर परिषदेसाठी आले. युक्रेनचे युद्ध संपविण्यासाठी अमेरिका आपला उत्तम मित्र बनून साथ देईल या झेलेन्स्की यांच्या विचारांवर पाणी ओतण्याचे काम डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. युक्रेनच्या युद्धात झेलेन्स्की यांची बाजू कमकुवत आहे. अमेरिकेने युक्रेनला मदत केली नसती, तर हे युद्ध कधीच संपले असते, अशा शब्दांत ट्रम्प यांनी अपमान केल्यामुळे संतापलेले झेलेन्स्की बैठकीतून उठले व व्हाइट हाऊसमधून निघून गेले.
ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना बैठकीतून घालविले, अशीही चर्चा प्रसारमाध्यमांत रंगली होती. त्यानंतर झेलेन्स्की ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी आयोजिलेल्या शिखर परिषदेसाठी लंडनमध्ये आले. या शिखर परिषदेत फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, इटली, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, स्पेन, तुर्की, फिनलंड, स्वीडन, रोमानिया आदी देश तसेच नाटोसारख्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेच्या दौऱ्यावर आलेल्या एखाद्या राष्ट्रप्रमुखाचा अशा रीतीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अवमान केल्याची घटना खूपच दुर्मीळ आहे.
या बैठकीत ट्रम्प बेधडकपणे झेलेन्स्की यांना म्हणाले की, तुम्ही म्हणता युक्रेन युद्धबंदी करणार नाही, पण ती करावी लागेल. युक्रेनच्या अध्यक्षांच्या वर्तनामुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता आहे. ते यावर जुगार खेळत आहेत. या संभाषणात ट्रम्प यांनी युक्रेनच्या अध्यक्षांवर वारंवार टीका केली. युक्रेन व अमेरिकेमध्ये खनिजांसंदर्भात करार होणार होता, पण त्याची चर्चादेखील रद्द करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
कटुता बाजूला ठेवून आभार मानले
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वादावादी होऊनही त्या गोष्टी शनिवारी उगाळल्या नाहीत. अमेरिकेने अनेक बाबतीत युक्रेनला पाठिंबा दिल्याबद्दल झेलेन्स्की यांनी आभार मानले. तसेच अमेरिकी काँग्रेस, त्या देशातील जनता यांचे आम्हाला नेहमीच सहकार्य लाभत राहील, अशी आशा व्यक्त केली. दरम्यान, तुर्कस्थानचे परराष्ट्रमंत्री हाकान फिदान यांनी शनिवारी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्याशी युक्रेनमधील युद्धाबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली. फिदान लंडनमध्ये युरोपीय नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत. तिथे युक्रेन युद्ध समाप्त करण्यासाठी चर्चा केली जाईल.
हमी मिळाली तरच शांतता करारात सहभाग : झेलेन्स्की
झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांची माफी मागण्यास नकार दिला आहे. त्यांनी वृत्तसंस्थांना सांगितले की, जोपर्यंत सुरक्षेची हमी मिळत नाही, तोपर्यंत ते कोणत्याही शांतता करारात सहभागी होणार नाहीत.
झेलेन्स्की म्हणाले की, ते ट्रम्प यांचा आदर करतात, पण त्यांनी काही वाईट केले नाही. त्यांनी हे देखील सांगितले की, हा वाद दोघांसाठीही चांगला नव्हता, पण ट्रम्प यांना हे समजून घेणे आवश्यक आहे की, युक्रेन रशियाबाबतची आपली भूमिका एका दिवसात बदलू शकत नाही.
झेलेन्स्की म्हणाले की, या वादानंतरही ट्रम्प यांनी युक्रेनला अधिक पाठिंबा दर्शवावा, अशी त्यांची इच्छा आहे. ते म्हणाले की, भागीदार म्हणून युक्रेनला अमेरिकेला कधीही गमवायचे नाही. झेलेन्स्की म्हणाले की, जोपर्यंत युक्रेनला पूर्ण सुरक्षेची हमी मिळत नाही, तोपर्यंत ते रशियासोबत शांतता करारात सहभागी होणार नाहीत.