हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 05:30 IST2025-12-20T05:27:46+5:302025-12-20T05:30:09+5:30
इन्कलाब मंचचे नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर देशाच्या विविध भागांत निदर्शने, हिंसाचार झाला असून, देशात तणावाचे वातावरण आहे.

हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
ढाका/नवी दिल्ली: बांगलादेशात गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या उठावाचे प्रमुख नेते व इन्कलाब मंचचे नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर देशाच्या विविध भागांत निदर्शने, हिंसाचार झाला असून, देशात तणावाचे वातावरण आहे.
निदर्शकांनी चितगावमधील भारतीय उप-उच्चायुक्तांच्या निवासस्थानातर दगडफेक करून भारताविरोधात घोषणा दिल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार करत १२ जणांना ताब्यात घेतले.
गुरुवारी रात्री देशाचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी राष्ट्रीय टीव्हीवरून देशाला संबोधित करताना 'इन्कलाब मंच'चे नेते हादी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिल्यानंतर या घटना घडल्या. खलिदा झिया यांच्या समर्थकांनी हिंसाचारावरून सरकारवर टीका केली.
गोळीबारात जखमी
इन्कलाब मंच या संघटनेचे नेते शरीफ उस्मान हादी यांच्यावर गेल्या आठवड्यात ढाक्यात ते निवडणूक प्रचार करत असताना एका बुरखाधारी बंदूकधाऱ्याने गोळी झाडली होती. डोक्याला गोळी लागून जखमी झालेल्या हादी यांना सिंगापूरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले होते. पण, गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.
हिंदूची जमावाकडून हत्या
बांगलादेशात ईशनिंदेच्या कथित संशयावरून एका हिंदू तरुणाची जमावाने ठेचून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळला. मृत तरुणाचे नाव दीपू चंद्र दास (वय २५) असे असून, तो मयमनसिंग शहरातील कारखान्यात कामगार होता. गुरुवारी रात्री कारखान्याबाहेर जमावाने दीपूला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर एका झाडाला त्याला लटकवले.
'बांगला ट्रिब्यून'ने याबाबत वृत्त दिले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
बांगलादेशातील अंतरिम सरकारने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घृणास्पद गुन्ह्यातील दोषींना सोडले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया सरकारने दिली आहे.
हल्लेखोर भारतात पळाला?
शरीफ उस्मान हादी याला मारणारा हल्लेखोर भारतात पळून गेल्याचा आरोप 'नॅशनल सिटीझन पार्टी' या पक्षाने केला आहे. शुक्रवारी ढाका विद्यापीठात या पक्षाने आयोजित केलेल्या शोकसभेत कार्यकर्त्यांनी भारताविरोधात घोषणा दिल्या. तसेच भारतीय उच्चालय बंद ठेवण्यात येईल, अशी धमकीही दिली.