Serbia Parliament : युरोपीय देश सर्बियाच्या संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोठा गदारोळ केला. विरोधकांनी चक्क संसदेत एकापाठोपाठ एक स्मोक ग्रेनेड आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्याने अधिवेशनात प्रचंड गोंधळ उडाला. यावेळी अनेक खासदारांमध्ये हाणामारी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. विरोधकांच्या कृतीमुळे संपूर्ण संसदेत काळा आणि गुलाबी धूर पसरला होता.
विरोधकांनी कोणत्या मुद्द्यावरून गोंधळ घातला?चार महिन्यांपूर्वी सर्बियातील रेल्वे स्टेशनचे छत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर सरकारच्या विरोधात निदर्शने सुरू झाली, जी सरकारसाठी सर्वात मोठा धोका बनली आहे. विधानसभेच्या अधिवेशनात सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टी (SNS) च्या नेतृत्वाखालील सत्ताधारी युतीने अधिवेशनाचा अजेंडा मंजूर केला, त्यानंतर काही विरोधी नेते जागेवरुन उठले आणि संसदेच्या अध्यक्षांकडे धावले. यावेळी त्यांची सुरक्षा रक्षकांशी बाचाबाची झाली.
मंगळवारी सर्बियन संसद देशाच्या विद्यापीठांसाठी निधी वाढविण्यासाठी कायदा करणार होती. या कायद्याच्या मागणीसाठी सर्बियन विद्यार्थी डिसेंबरपासून आंदोलन करत आहेत. देशाचे पंतप्रधान मिलोस वुसेविक यांच्या राजीनाम्यावरही संसदेत चर्चा होणार होती, परंतु सत्ताधारी आघाडीने अधिवेशनाच्या अजेंड्यावर असे अनेक मुद्दे ठेवले, ज्यामुळे विरोधक संतप्त झाले. स्पीकर अना ब्रनाबिक यांनी सांगितले की, या घटनेत दोन खासदार जखमी झाले असून, एसएनएस पक्षाच्या जस्मिना ओब्राडोविक यांना पक्षाघाताचा झटका आला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.