Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 14:13 IST2025-09-09T14:11:53+5:302025-09-09T14:13:20+5:30

एकीकडे संतप्त जनतेने नेपाळी मंत्र्यांची घरे जाळली, तर दुसरीकडे आता त्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.

Video: Protests in Nepal flare up further; Security forces attacked after ministers' houses were burnt | Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला

Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला

नेपाळमधील आंदोलन दुसऱ्या दिवशी आणखी पेटलेलं दिसत आहे. या जमावाला आवर घालणं आता सरकारला देखील कठीण होत आहे. एकीकडे संतप्त जनतेने नेपाळी मंत्र्यांची घरे जाळली, तर दुसरीकडे आता जनतेने सुरक्षा दलांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. काठमांडूमध्ये निदर्शकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली आणि त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली. आंदोलक नेपाळमधील बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीच्या मुद्द्यांवरून निदर्शने करत आहेत. 

सरकारने निदर्शकांना हिंसाचार थांबवून चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने राजीनामा द्यावा आणि अंतरिम सरकार स्थापन करावे, अशी मागणी आंदोलक करत आहेत. यासह पुन्हा निवडणुका घेण्याची आणि पंतप्रधानांसह सर्व खासदारांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहेत. सोमवारी झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

निषेधाचे रूपांतर हिंसाचारात कसे झाले?
ओली सरकारवर भ्रष्टाचार संपवण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तरुणांना बेरोजगारी, आर्थिक मंदी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडायचे होते. सोमवारी हजारो तरुणांनी काठमांडूमधील संसद भवनासमोर निदर्शने केली. ते सरकारकडे सोशल मीडियावरील बंदी उठवण्याची मागणी करत होते. यातील काही लोक संसदेच्या आवारात घुसले, त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी पाण्याच्या मारा केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केला. मात्र, यानंतर जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. 

Web Title: Video: Protests in Nepal flare up further; Security forces attacked after ministers' houses were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.