Video: ब्रेकिंग न्यूज देताना अॅंकरसोबत झाली चक्क कुत्र्याची एन्ट्री
By Admin | Updated: May 24, 2017 16:50 IST2017-05-24T16:38:15+5:302017-05-24T16:50:12+5:30
न्यूज अॅंकर आणि रिपोर्टरसह लाइव्ह कार्यक्रमांमध्ये अनेकदा खूप मजेशीर घटना घडत असतात. रशियातील एका न्यूज चॅनलमध्येही अशीच काहीशी घटना

Video: ब्रेकिंग न्यूज देताना अॅंकरसोबत झाली चक्क कुत्र्याची एन्ट्री
ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. 24 - न्यूज अॅंकर आणि रिपोर्टरसह लाइव्ह कार्यक्रमांमध्ये अनेकदा खूप मजेशीर घटना घडत असतात. रशियातील एका न्यूज चॅनलमध्येही अशीच काहीशी घटना घडली आहे. येथील न्यूज चॅनलच्या महिला अॅंकरसोबत झालेल्या या घटनेला लाखो लोकांनी लाइव्ह पाहिलं, थोड्यावेळ दर्शक अवाक् झाले पण नंतर हसल्याशिवाय त्यांना राहावलं नाही. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
रशियातील "चॅनल वर्ल्ड 24" या चॅनलची न्यूज अॅंकर मॉस्कोमध्ये झालेल्या एका घटनेचं वृत्त देत होती. वृत्त देत असतानाच अचानक एका काळ्या रंगाच्या लॅब्रोडोर जातीच्या कुत्र्याची स्टुडिओमध्ये एन्ट्री झाली. अचानक कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज ऐकून न्यूज अॅंकर जरा दचकली पण तिने न्यूज देण्याचं काम सुरूच ठेवलं. थोड्याच वेळात पुन्हा कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला मग मात्र अॅंकर घाबरली आणि मागे वळून पाहिलं तर तिच्या मागे एक काळा कुत्रा होता. ते पाहून एंकरलाही हसू आवरलं नाही पण स्वतःला सावरत तिने बातम्या देणं सुरूच ठेवलं. त्या कुत्र्याने उड्या मारून अॅंकरच्या समोरील डेस्कवर बसण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये अपयशी ठरल्यानंतर अखेर त्या कुत्र्याने आपलं डोकं डेस्कवर टेकवलं आणि आराम करायला लागला. तर कधी तो कुत्रा अॅंकरच्या मागे जाऊन लपून बसला. हा मजेशीर व्हिडीओ युट्यूबवर अपलोड केल्यापासून दर्शकांच्या पसंतीस उतरला असून चांगलाच व्हायरल होत आहे.
मात्र, या कुत्र्याला जाणूनबुजून लाइव्ह बूलेटीनमध्ये पाठवलं होतं की हा निव्वळ योगायोग होता हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
पाहा व्हिडीओ-