ब्रिटनमध्ये सर्वसामान्यांना पुढील आठवड्यापासून लस; फायझर-बायोएनटेकचे डाेस माेफत देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 04:52 IST2020-12-03T04:52:22+5:302020-12-03T04:52:39+5:30
ही लस ९५ टक्के परिणामकारक आहे. हे लक्षात घेऊनच या लसीला सामूहिक लसीकरणासाठी परवानगी दिली आहे.

ब्रिटनमध्ये सर्वसामान्यांना पुढील आठवड्यापासून लस; फायझर-बायोएनटेकचे डाेस माेफत देणार
लंडन : जगभरातील अब्जावधी लोक कोरोनाविरोधी लस कधी येणार, याची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर त्यांची प्रतीक्षा सुफळ झाली असे म्हणावे लागेल. ब्रिटन हा कोरोनाला प्रतिबंध करणारी लस जनतेला उपलब्ध करून देणारा जगातील पहिला देश ठरला आहे. ब्रिटनने फायझर-बायोएनटेकच्या लसीची निवड केली असून, पुढील आठवड्यापासून तिथे सामूहिक लसीकरण मोहिमेला प्रारंभ होईल.
ब्रिटन सरकारची औषध नियंत्रक यंत्रणा एमएचआरएच्या प्रमुख डॉ. जून रेन यांनी सांगितले की, फायझर-बायोएनटेकने अतिशय कठोर निकष लावून कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचण्या पार पाडल्या आहेत. ही लस ९५ टक्के परिणामकारक आहे. हे लक्षात घेऊनच या लसीला सामूहिक लसीकरणासाठी परवानगी दिली आहे.
भारतात जानेवारीअखेरीस सुरुवात
भारतात लस देणे कधी सुरू होईल, हे जाहीर झालेले नाही. पण, या वर्षाच्या अखेरीस वा जानेवारीत भारतातही काही लाख लोकांना ती दिली जाईल, असा अंदाज आहे. त्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस आदींचा समावेश असेल.
रशियात पुढच्या आठवड्यापासून
रशियामध्ये पुढच्या आठवड्यापासून जनतेला कोरोनाविरोधी लस देण्याचे काम सुरू केले जाईल, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी केली.
युरोप, अमेरिकेत डिसेंबर वा जानेवारीत
चीन, उत्तर कोरिया हे देशही यात मागे नाहीत. मॉडर्ना कंपनीनेही लसीकरणास लगेच संमती द्यावी, अशी विनंती अमेरिका आणि युरोपीय देशांना केली आहे. त्यामुळे तिथेही डिसेंबर वा जानेवारीत लस देणे सुरू होईल.