वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 20:33 IST2025-10-16T20:31:10+5:302025-10-16T20:33:48+5:30
Online Food Felivery Froud: जपानमधील एका व्यक्तीने फूड डिलिव्हरी अॅपवरून सलग दोन वर्षांपासून १००० वेळा जेवण ऑर्डर केल्याची आणि प्रत्येकवेळी त्याचे पैसेही रिफंडमध्ये परत मिळवल्याची अजब घटना समोर आली आहे.

वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...
जपानमधील एका व्यक्तीने फूड डिलिव्हरी अॅपवरून सलग दोन वर्षांपासून १००० वेळा जेवण ऑर्डर केल्याची आणि प्रत्येकवेळी त्याचे पैसेही रिफंडमध्ये परत मिळवल्याची अजब घटना समोर आली आहे. ही व्यक्ती ऑनलाईन ऑर्डर करताना अशी ट्रीक वापरायची की ज्यामुळे त्याचे पैसे रिफंड व्हायचे. अशा प्रकारे त्याने सुमारे दोन वर्षांपर्यंत फ्रीमध्ये ऑनलाईन ऑर्डर करून जेवण केलं.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जपानमधील ताकुया हिगाशिमोतो नावाच्या एका व्यक्तीने फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या रिफंड पॉलिसीचा वापर करत दोन वर्षांत तब्बल १ हजार वेळा मोफत जेवण केलं. बेरोजगार असलेल्या हिगाशिमोतोने डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर १२४ अकाउंट्स उघडली होती. तसेच ओळख लपवण्यासाठी तो नियमितपणे साइन अप करायचा. तसेच काही दिवसांतच हे अकाउंट बंद करायचा.
शेवटी या ३८ वर्षीय ताकुया हिगाशिमोतो याला फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्ममधील त्रुटींचा फायदा उचलून फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याने कंपनीला ३.७ दशलक्ष येन म्हणजेच २१ लाख रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घातल्याचे निष्पन्न झाले.
ताकुया हिगाशिमोतो याने फ्रीमध्ये ऑर्डर मिळवण्यासाठी एक ट्रिक अवलंबली होती. तो साईटवर कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीचा पर्याय निवडायचा. त्यानंतर आपल्याकडे डिलिव्हरी आली नसल्याचा बहाणा करून कंपनीकडून रिफंड घ्यायचा. आता पोलिसांसमोर त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. तसेच कंपनीने फसवणूक टाळण्यासाठी सिस्टिममध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने पावलं टाकली आहेत.