धक्कादायक! ट्रम्प यांच्या धोरणाच्या भीतीने ११ वर्षांच्या निरागस मुलीने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 22:29 IST2025-02-20T22:29:17+5:302025-02-20T22:29:57+5:30
US Policies, texas girl suicide: अवघ्या ११ वर्षांच्या मुलीच्या बाबतीत असं काय घडलं, तिने असा निर्णय का घेतला? जाणून घ्या.

धक्कादायक! ट्रम्प यांच्या धोरणाच्या भीतीने ११ वर्षांच्या निरागस मुलीने उचललं टोकाचं पाऊल
US Policies, texas girl suicide: अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका ११ वर्षांच्या निष्पाप मुलीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. असे म्हटले जात आहे की शाळेत तिला तिच्या कुटुंबाच्या इमिग्रेशन स्टेटसबद्दल सतत टोमणे मारले जात होते. तिच्या शाळेतील वर्गमित्रांनी तिला चिडवले होते आणि धमकी दिली होती की तिच्या पालकांना अमेरिकेतून हद्दपार केले जाईल आणि ती इथे एकटी पडेल. या मानसिक ताणातून आणि भीतीमुळे ११ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
रिपोर्ट्समधील दाव्यानुसार, टेक्सासमधील जोसेलिन रोजो कॅरांझा नावाच्या मुलीला शाळेत सतत त्रास दिला जात होता. तिच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी तिच्या कुटुंबाच्या इमिग्रेशन स्टेटसवरून तिला त्रास दिल्याचा आरोप आहे. मुलांनी तिला घाबरवले की तिच्या पालकांना बेड्या घालून देशाबाहेर पाठवले जाईल आणि तिला या देशात एकटीलाच राहावं लागेल. या मानसिक छळाला बळी पडून जोसेलिनने ८ फेब्रुवारीला टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.
आईला शाळेतील प्रकाराची कल्पनाच नाही...
जोसेलिनची आई मार्बेला कॅरांझा म्हणाली की तिला तिच्या मुलीवर होणाऱ्या अत्याचाराची काहीच माहिती नव्हती. माझ्या मुलीने कधीही असे कोणतेही संकेत दिले नाहीत की ती इतकी तणावात आहे. शाळेत तिला त्रास दिला जात आहे हे मला कधीच माहित नव्हते. जेव्हा या प्रकरणाची चौकशी सुरू झाली तेव्हा मला कळले की जोसेलिन शाळेत समुपदेशन (काउन्सेलिंग) घेत आहे, परंतु शाळा प्रशासनाने याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
शाळा प्रशासनावर उपस्थित झाले प्रश्न
जोसेलिनच्या आत्महत्येनंतर शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तिच्या आईचा आरोप आहे की शाळेला याची माहिती होती पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. या प्रकरणाची चौकशी गेन्सविले इंडिपेंडेंट स्कूल जिल्हा पोलिसांकडून केली जात आहे. शाळा प्रशासनाने सांगितले की ते छळाच्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवले जाते आणि अशा तक्रारी ते गांभीर्याने घेतात, परंतु जोसेलिनच्या प्रकरणात कोणतेही ठोस विधान जारी करण्यात आलेले नाही.