'मला आशा आहे माझी हिंदू पत्नी एक दिवस कॅथलिक बनेल'; अमेरिकेच्या जेडी व्हान्स यांच्या वक्तव्याने वादाला तोंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 14:48 IST2025-10-31T14:44:25+5:302025-10-31T14:48:41+5:30
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी त्यांची पत्नी उषा व्हान्स कॅथोलिक चर्चच्या प्रभावाखाली येऊन एके दिवशी ख्रिश्चन धर्म स्वीकारतील अशी इच्छा व्यक्त केली.

'मला आशा आहे माझी हिंदू पत्नी एक दिवस कॅथलिक बनेल'; अमेरिकेच्या जेडी व्हान्स यांच्या वक्तव्याने वादाला तोंड
JD Vance on Christianity: अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी.व्हान्स यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे अमेरिकेतील धार्मिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मिसिसिपी येथील टर्निंग पॉइंट यूएसए कार्यक्रमात बोलताना वॅन्स यांनी, हिंदू धर्मात वाढलेल्या आपल्या पत्नी उषा वॅन्स यांनी भविष्यात कॅथलिक चर्चने प्रेरित व्हावे आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारावा अशी इच्छा व्यक्त केली. अमेरिकेत एच-१बी व्हिसा आणि स्थलांतरितांवरून वातावरण तापलेले असताना, वॅन्स यांचे हे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
एका कार्यक्रमात, एका भारतीय विद्यार्थ्याने त्यांना विचारले "मी अमेरिकेवर प्रेम करतो हे सिद्ध करण्यासाठी मला ख्रिश्चन धर्म का स्वीकारावा लागतो? असा सवाल केला. यावेळी जे.डी. व्हान्स यांच्या पत्नी उषा व्हान्स यांचा उल्लेख करून प्रत्युत्तर दिलं.
पत्नी उषा 'ख्रिस्ताकडे येतील' का, असा थेट प्रश्न विचारल्यावर वॅन्स यांनी आपले मत स्पष्ट केले. "बहुतेक रविवारी उषा माझ्यासोबत चर्चमध्ये येते. मी तिला सांगितले आहे, सार्वजनिकरित्या सांगितले आहे आणि आज इथे माझ्या १० हजार जवळच्या मित्रांसमोरही सांगतो – ज्या गोष्टीने मला चर्चेमध्ये जाण्याची प्रेरणा दिली, त्याच गोष्टीने तिलाही प्रेरणा मिळावी अशी माझी इच्छा आहे. होय, प्रामाणिकपणे, माझी तशी इच्छा आहेच. कारण, माझा ख्रिस्ती गॉस्पेलवर विश्वास आहे आणि मला आशा आहे की माझ्या पत्नीलाही ते लवकरच पटेल," असं जे.डी. वॅन्स म्हणाले.
वॅन्स यांनी पुढे स्पष्ट केले की, त्यांच्या पत्नीचा सध्याचा धर्म त्यांच्यासाठी समस्या नाही. "पण जर पत्नीने धर्म बदलला नाही, तरीही देवाने प्रत्येकाला स्वतःच्या इच्छेनुसार निर्णय घेण्याची शक्ती दिली आहे. त्यामुळे मला कोणतीही अडचण येत नाही. ही गोष्ट तुम्ही तुमच्या मित्रांशी, कुटुंबाशी आणि तुमच्या प्रिय व्यक्तीशी बोलून सोडवू शकता, असेही व्हान्स म्हणाले.
धर्मांतर आणि राजकीय भूमिका
जे.डी. व्हान्स, जे रिपब्लिकन नेते आहेत, त्यांनी २०११ मध्ये हिंदू-धर्मीय उषा यांच्याशी विवाह केला. त्यांची पत्नी उषा वॅन्स यांचे मूळ नाव गोपी वेंकटरामी शेट्टी आहे आणि त्या भारतीय वंशाच्या आहेत. २०१३ पर्यंत व्हान्स स्वतःला नास्तिक मानत होते. पण २०१९ मध्ये त्यांनी कॅथलिक धर्म स्वीकारला. त्यांनी त्यांची मुले ख्रिस्ती धर्माप्रमाणे वाढवली आहेत आणि ती ख्रिस्ती शाळेत जातात.
व्हान्स यांनी 'चर्च आणि राज्य वेगळे ठेवण्याच्या प्रश्नावरही भाष्य केले. "ख्रिस्ती मूल्ये या देशाचा एक महत्त्वाचा आधार आहेत, असे मानण्यासाठी मी माफी मागत नाही. जे कोणी तुम्हाला त्यांचे मत तटस्थ आहे असे सांगत आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला विकायला एक अजेंडा असण्याची शक्यता आहे आणि मी किमान याबद्दल प्रामाणिक आहे की, मला या देशाचा ख्रिस्ती पाया चांगला वाटतो," असं व्हान्स यांनी म्हटलं.