अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:37 IST2025-09-19T12:30:54+5:302025-09-19T12:37:12+5:30

३१ ऑगस्ट रोजी ढाका येथील वेस्टिन हॉटेलमध्ये अमेरिकन स्पेशल फोर्सेस कमांड ऑफिसरचा मृतदेह सापडल्यानंतर काही दिवसांतच बांगलादेशात अमेरिकन सैन्य दाखल झाले आहे

US troops arrive in Bangladesh in secret; 120 soldiers arrive, is something big happening? | अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?

अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?

ढाका - बांगलादेशात शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस आणि अमेरिकेत काहीतरी शिजत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच अमेरिकेचे सैन्य आणि वायूसेनेचे १२० अधिकारी १० सप्टेंबरला चटगाव येथे पोहचल्याचं समोर आले. हे अधिकारी यूएस बांगलादेश विमानाने ढाकाच्या चटगाव येथे उतरले. तिथून ते सगळे रेडिसन ब्ल्यू हॉटेलला दाखल झाले. अमेरिकेचे सैन्य अधिकारी पोहचण्यापूर्वी या हॉटेलमध्ये ८५ रूम बुक करण्यात आल्या होत्या असं नॉर्थ ईस्ट न्यूजने दावा केला आहे. हे अधिकारी बांगलादेशात एका संयुक्त अभ्यास कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहचलेत असं सांगितले जात आहे.

हॉटेल रजिस्टरमध्ये नोंद नाही

विशेष म्हणजे अमेरिकेचे सैन्य जवान ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तिथे गेस्ट रजिस्टरमध्ये कुठल्याही नावाची नोंदणी नाही. १४ सप्टेंबरला इजिप्शियन हवाई दलाचे एक वाहतूक विमानही चटगावच्या शाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यानंतर एका दिवसानंतर १५ सप्टेंबर रोजी अमेरिकन सैन्याने बांगलादेश हवाई दलाच्या पटेंगा एअरबेसची पाहणी दौरा केला. २० सप्टेंबरला अमेरिकेचे सैन्य चटगावहून रवाना होतील असं बोलले जाते. 

३१ ऑगस्ट रोजी ढाका येथील वेस्टिन हॉटेलमध्ये अमेरिकन स्पेशल फोर्सेस कमांड ऑफिसरचा मृतदेह सापडल्यानंतर काही दिवसांतच बांगलादेशात अमेरिकन सैन्य दाखल झाले आहे. ढाका पोलिसांनी या अधिकाऱ्याची ओळख ५० वर्षीय टेरेन्स आर्व्हेल जॅक्सन म्हणून केली आहे, जे या वर्षी एप्रिलमध्ये बांगलादेशात आले होते. हा मृत्यू संशयास्पद मानला जात आहे. पोलिस आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बांगलादेश लष्कराला त्यांच्या देशात  अमेरिकन सैन्याच्या हजेरीबाबत चिंता वाटत होती. अमेरिकन सैन्याने यापूर्वी टायगर लाइटनिंग २०२५ आणि ऑपरेशन लाइटनिंगमध्ये भाग घेतला आहे, ज्याचा उद्देश शांतता राखण्याची तयारी वाढवणे आणि दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील परस्पर कार्यक्षमता वाढवणे होता. प्रादेशिक सुरक्षा मजबूत करणे आणि अमेरिका बांगलादेश सैन्याला पाठिंबा देऊ शकेल अशा क्षेत्रांचा शोध घेणे हा देखील यामागील उद्देश होता.

दरम्यान, मुहम्मद युनूस बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार झाल्यापासून बांगलादेशातील अमेरिकेच्या कारवाया लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. अमेरिका आणि चीन दोघेही म्यानमारमधील बंडखोर गटांवर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकन सैन्याने अनेक वेळा चटगावला भेट दिली आहे, ज्यामध्ये बांगलादेशी सैन्यासोबत संयुक्त सराव आणि गुप्तचर मोहिमा समाविष्ट आहेत.

Web Title: US troops arrive in Bangladesh in secret; 120 soldiers arrive, is something big happening?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.