भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:08 IST2025-10-08T15:06:13+5:302025-10-08T15:08:20+5:30
AMRAAM Missiles: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संघर्षानंतर पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेले संबंध अधिक दृढ होताना दिसत आहेत.

भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संघर्षानंतर पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेले संबंध अधिक दृढ होताना दिसत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वेळोवेळी केलेले कौतुक आता फळाला आले आहे. या मैत्रीच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका लवकरच पाकिस्तानला अत्याधुनिक AMRAAM क्षेपणास्त्रे देणार आहे. पाकिस्तान गेल्या अनेक दिवसांपासून नवीन पिढीचे AMRAAM मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते.
AIM-120 AMRAAM हे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र लांब पल्ल्याच्या शत्रूच्या विमानांना लक्ष्य करण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र F-16 फाल्कन लढाऊ विमानांवर बसवले जाते. २०१९ च्या बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाने भारतासोबतच्या हवाई चकमकींदरम्यान त्याचा वापर केला. सध्या पाकिस्तानी हवाई दलाकडे AIM-120C-5 आवृत्ती आहे. मात्र, नवीन करार C-8 आणि D-3 आवृत्त्यांच्या उत्पादनासाठी आहे, ज्यांची रेंज आणि अचूकता पूर्वीच्या आवृत्तीपेक्षा जास्त आहे.
AIM-120D-3 ही AMRAAM कुटुंबाची नवीनतम आणि सर्वात उच्च-तंत्रज्ञान असलेली आवृत्ती आहे. ही क्षेपणास्त्रे शत्रूच्या लढाऊ विमानांवर आणि क्षेपणास्त्रांवर हल्ले करण्यासाठी खास डिझाइन केलेली आहेत. संरक्षण विश्लेषकांचे म्हणणे आहे की, "हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या सध्याच्या F-16 ताफ्याची ऑपरेशनल रेंज आणि अचूकता आणखी वाढवेल. यामुळे पाकिस्तान हवाई दल हवाई धोक्यांना अधिक प्रभावीपणे प्रत्युत्तर देऊ शकेल."