यूएस देणार एआय शक्ती, आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी; बायडेन यांच्या कार्यकाळातील धाेरण रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 06:55 IST2025-01-25T06:52:15+5:302025-01-25T06:55:06+5:30
United State news: एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेत जागतिक पातळीवर वर्चस्व गाजवण्याशी संबंधित एका अध्यादेशावर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. ‘एआय’ला वैचारिक भिन्नता किंवा सामाजिक धोरणांपासून मुक्त करण्याची तरतूद या आदेशात आहे.

यूएस देणार एआय शक्ती, आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी; बायडेन यांच्या कार्यकाळातील धाेरण रद्द
वाॅशिंग्टन - एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेत जागतिक पातळीवर वर्चस्व गाजवण्याशी संबंधित एका अध्यादेशावर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. ‘एआय’ला वैचारिक भिन्नता किंवा सामाजिक धोरणांपासून मुक्त करण्याची तरतूद या आदेशात आहे.
ट्रम्प यांच्या या आदेशानुसार ट्रम्प यांनी मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या काळातील सर्व धोरणे, कार्यवाही तसेच आदेशांमध्ये दुरुस्ती करण्याचे किंवा ते रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. बायडेन यांच्या धोरणांमुळे एआयच्या क्षेत्रात नवोन्मेषावर नकारात्मक परिणाम होत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात २०१९मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी आदेशावर स्वाक्षरी केली होती. त्यात अमेरिकेच्या आर्थिक, राष्ट्रीय सुरक्षेसह एआयमधील वर्चस्वाला मंजुरी देण्यात आली होती.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी (जेएफके), सिनेटर रॉबर्ट एफ. केनेडी आणि मार्टिन ल्युथर किंग यांच्या हत्येसंबंधीच्या फाईल सार्वजनिक करण्याच्या आदेशावरही ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. (वृत्तसंस्था)
रशियाने ट्रम्प यांच्या दाव्याची उडवली खिल्ली
दावोस परिषदेत तेलाच्या कमती कमी करण्यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याची रशियाने खिल्ली उडवली.
युद्ध हे तेलाच्या किमतीवर अवलंबून नसते. रशियाच्या सुरक्षेला निर्माण झालेला धोका, तसेच सुरक्षा चिंतांकडे अमेरिका व युरोपीय देशांनी दुर्लक्ष केल्यामुळे युक्रेनसोबत संघर्ष उडाल्याचा दावा करत रशियाच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी ट्रम्प यांना लक्ष्य केले.
पुतीन यांनी युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने युक्रेनशी करार करावा, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांचे इतर निर्णय
संरक्षणमंत्री म्हणून ट्रम्प यांचे पीट हेगसेथ यांच्या नावाला प्राधान्य.
जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग यांची भेट घेणार.
माजी परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली़
ट्रम्प यांना दणका, ‘बर्थराईट’च्या निर्णयाला स्थगिती
जन्माधारित अमेरिकी नागरिकत्वाचा अधिकार समाप्त करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देत संघीय न्यायालयाने ट्रम्प यांना धक्का दिला आहे.
ट्रम्प यांनी दिलेला हा आदेश म्हणजे अमेरिकी संविधानाच्या १४व्या दुरुस्तीतील नागरी अधिकारांचे उल्लंघन असल्याचा युक्तिवादी या याचिकांत करण्यात आला आहे.
हा अधिकार संपवण्याचा कोणताही घटनात्मक अधिकार अमेरिकी राष्ट्राध्यक्ष किंवा संसदेकडे नसल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता.