"मला त्याला भेटायचेही नव्हते," डोनाल्ड ट्रम्प यांची लंडनच्या मुस्लिम महापौरांवर टीका; म्हणाले, "तो सर्वात वाईट आहे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 20:33 IST2025-09-19T20:32:01+5:302025-09-19T20:33:49+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लंडनचे महापौर सादिक खान यांच्यावर जोरदार टीका केली.

"मला त्याला भेटायचेही नव्हते," डोनाल्ड ट्रम्प यांची लंडनच्या मुस्लिम महापौरांवर टीका; म्हणाले, "तो सर्वात वाईट आहे"
Donald Trump on Sadiq Khan: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युनायटेड किंग्डमच्या दौऱ्यावरुन परतल्यावर लंडनचे महापौर सादिक खान यांच्यावर जोरदार टीका केली. एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सादिक खान यांना जगातील सर्वात वाईट महापौर म्हटले. महापौर सादिक खान आमच्यासोबत जेवणाला यावेत असे मला अजिबात वाटत नव्हते, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
युनायटेड किंग्डममध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी एका राजकीय रात्रीच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला लंडनचे महापौर सादिक खान उपस्थित होते. डोनाल्ड ट्रम्प आणि लंडनचे महापौर सादिक खान यांच्याशी जुने वैर आहे. दोघांनी वारंवार एकमेकांवर टीका केली आहे. लंडनहून वॉशिंग्टनला परतताना ट्रम्प यांनी पुन्हा सादिक खान यांच्यावर टीकास्त्र डागलं. लंडनचे महापौर सादिक खान यांनी विंडसर कॅसल येथे राजाने आयोजित केलेल्या राजकीय भोजनाला उपस्थित राहावे अशी त्यांची इच्छा नव्हती. ट्रम्प यांनी यापूर्वी सादिक खान यांचे वर्णन वाईट माणूस असे केले होते.
"मला तो माणूस तिथे नको होता, मी त्याला तिथे न बोलवण्याची विनंती केली होती. सादिक खान हे जगातील सर्वात वाईट महापौरांपैकी एक आहेत, जिथे स्थलांतरितांचा ओघ देशात समस्या निर्माण करत आहे. त्यांच्यामुळे लंडनमधील गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. मला वाटतं त्यांनी खूप वाईट काम केली आहेत," असं ट्रम्प म्हणाले.
"मला तो बऱ्याच काळापासून आवडत नाही. मला लंडन आणि ब्रिटनचा अभिमान आहे, माझ्या आईचा जन्म स्कॉटलंडमध्ये झाला होता आणि जेव्हा मी महापौर खान यांना वाईट गोष्टी करताना पाहतो - चाकूने वार करताना आणि गोंधळ घालताना, तेव्हा पूर्वीसारखं वाटत नाही. मला तो तिथे नको होता," असंही ट्रम्प म्हणाले. प्रत्युत्तरात, सादिक यांच्या जवळच्या एका सूत्राने ट्रम्प यांच्या टिप्पण्या फेटाळून लावल्या आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या वक्तृत्वामुळे भीती आणि फूट पसरते असं म्हटलं.