अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 20:27 IST2025-11-01T20:25:18+5:302025-11-01T20:27:46+5:30
वॉल स्ट्रीट जर्नलनेही ३० ऑक्टोबर रोजी असाच एक अहवाल दिला होता, परंतु त्यात हल्ल्याचा अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही असं म्हटलं होतं.

अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
वॉश्गिंटन - अमेरिकन वृत्तपत्र मियामी हेराल्डच्या एका रिपोर्टमुळे जगभरात खळबळ माजली आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलातील लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला आहे. हे हल्ले काही तास किंवा दिवसांत सुरू होऊ शकतात असा दावा या रिपोर्टमध्ये आहे. व्हेनेझुएलाच्या ड्रग कार्टेल नेत्यांना संपवण्याचा या हल्ल्याचा हेतू आहे परंतु परंतु ट्रम्प प्रशासनाने हा रिपोर्ट स्पष्टपणे नाकारला आहे.
रिपोर्टमध्ये काय आहे?
मियामी हेराल्डने ३१ ऑक्टोबर रोजी हे वृत्त प्रसारित केले आहे. त्यात म्हटलंय की, ट्रम्प प्रशासनाने सोल्स कार्टेल वापरत असलेल्या व्हेनेझुएलातील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कार्टेल ड्रग्ज तस्करीत सामील आहे आणि त्याचे नेते मादुरो, त्यांचे जवळचे सहकारी आहेत असा अमेरिकेचा दावा आहे. हे हल्ले हवाई आणि नौदलाचं संयुक्त ऑपरेशन असेल. त्यात कार्टेलच्या नेत्यांना मारण्यात येईल. हे कार्टेल दरवर्षी युरोप आणि अमेरिकेत ५०० टन कोकेन पाठवते असा अमेरिकन अधिकाऱ्याचा आरोप आहे. आता मादुरोची वेळ गेलेली आहे. तो पळून जाऊ शकणार नाही, कारण अनेक जनरल त्याला पकडण्यासाठी कटिबद्ध आहेत असं एका सोर्सने सांगितले. वॉल स्ट्रीट जर्नलनेही ३० ऑक्टोबर रोजी असाच एक अहवाल दिला होता, परंतु त्यात हल्ल्याचा अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही असं म्हटलं होतं.
या कार्टेलने व्हेनेझुएलाच्या लष्करात घुसखोरी केली आहे. अमेरिकेने मादुरोवर ५० मिलियन डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे. त्याचे सहकारी डिओसदाडो कॅबेलो आणि व्लादिमीर पॅड्रिनो लोपेझ यांच्या डोक्यावरही २५ मिलियन डॉलर्सचे बक्षीस आहे. अमेरिकेचे अॅटर्नी जनरल पाम बोंडी यांनी मादुरोला "कार्टेलचा प्रमुख" म्हटलं आहे. अमेरिकेने कॅरिबियन समुद्रात त्यांचं सैन्य वाढवले आहे. ड्रग्ज तस्करी रोखण्याच्या नावाखाली हे पाऊल उचलण्यात आले होते, परंतु अहवालांनुसार ते हल्ल्यांची तयारी असल्याचे दिसून येते. सप्टेंबर २०२५ पासून अमेरिकेने अनेक हल्ले केले आहेत, ज्यामध्ये ६१ संशयित तस्करांचा मृत्यू झाला आहे. आता जमिनीवर हल्ल्याची चर्चा आहे.
U.S. poised to strike military targets in Venezuela in escalation against Maduro regime https://t.co/hIFMkRMsBA
— Miami Herald (@MiamiHerald) October 31, 2025
अमेरिकेने फेटाळला रिपोर्ट
दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने हा रिपोर्ट खोटा असल्याचे सांगत फेटाळून लावला. या अज्ञात सूत्रांना याबद्दल काहीही माहिती नाही. कोणतीही घोषणा ट्रम्प यांच्या कडूनच होईल. ट्रम्प यांनी एअर फोर्स वनवर हल्ल्यांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही असं स्पष्ट सांगितले अशी माहिती ३१ ऑक्टोबर रोजी व्हाईट हाऊसच्या डिप्टी प्रेस सेक्रेटरी अन्ना केली यांनी दिली. तर मियामी हेराल्डमधील सूत्रांनी त्यांना फसवले आहे. ही एक खोटी बातमी आहे असं परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी एक्सवर लिहिले. मात्र सैन्याच्या तैनातीमुळे अजूनही संशय निर्माण झाला आहे.