पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 16:17 IST2026-04-12T16:14:37+5:302026-04-12T16:17:38+5:30
अमेरिका-इराण यांच्यातील चर्चा अयशस्वी ठरल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. पाकिस्तानात झालेली बैठक निष्फळ ठरल्याने जगाला आता पुन्हा युद्धाची भीती वाटत आहे.

पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
इस्लामाबाद - पाकिस्तानी राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा फिस्कटल्यानंतर आणखी एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या चर्चेत इराणी परराष्ट्र मंत्री सैय्यद अब्बास अराघची आणि मध्य पूर्वेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचा दावा तुर्कीच्या माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने केला आहे.
या रिपोर्टमध्ये म्हटलंय, या दोन्ही नेत्यांमधील चर्चा इतकी पेटली होती की, जवळपास हाणामारीची वेळ आली होती. पण कसेबसे दोघांना शांत करून तणाव कमी करण्यात आला. होर्मुझची सामुद्रधुनी हा विटकॉफ आणि अराघची यांच्यातील वादाचा एक प्रमुख मुद्दा बनला. जगातील या सर्वात महत्त्वाच्या जलमार्गाच्या नियंत्रणावरून आणि वर्चस्वावरून त्यांच्यात तीव्र मतभेद झाले. चर्चेत वातावरण अचानक भयंकर तापले होते. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कठोर शब्दांचा मारा केला. इराणी शिष्टमंडळाने इराणी नागरिकांविरुद्ध कोणत्याही प्रकारची धमकी दिली जाऊ नये असा कठोर आग्रह धरला ज्यामुळे तणाव आणखी वाढला.
इराणनं फेटाळला दावा
मात्र अमेरिकेच्या कोणत्याही अधिकृत सूत्रांनी अद्याप या घटनेला दुजोरा दिलेला नाही. राजनैतिक चर्चेत तणावपूर्ण शाब्दिक चकमकी होणे ही एक सामान्य बाब आहे असं तज्ज्ञ सांगतात. इराणनेही तुर्की माध्यमांचे हे वृत्त बनावट असल्याचं सांगत ही बातमी फेटाळून लावली आहे.
ट्रम्प यांची धमकी
दरम्यान, अमेरिका-इराण यांच्यातील चर्चा अयशस्वी ठरल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. पाकिस्तानात झालेली बैठक निष्फळ ठरल्याने जगाला आता पुन्हा युद्धाची भीती वाटत आहे. पाकिस्तानमधील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी भंग झाल्यास नवीन युद्ध होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा पाताळात पाठवण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर नौदल नाकेबंदी लादली आणि त्याचा फायदा झाला. आता ट्रम्प तीच रणनीती इराणवर वापरू शकतात. त्यातून इराणच्या तेल महसूलाचा मार्ग बंद होईल. चीन आणि भारतासारख्या देशांवर दबाव वाढेल. विशेष म्हणजे व्हेनेझुएलाच्या नाकेबंदीचे नेतृत्व करणारी युद्धनौका यूएसएस जेराल्ड फोर्ड सध्या पर्शियन आखातात तैनात आहे.