US Election 2020: प्रसारमाध्यमांचा ट्रम्प यांना दणका, भाषणाचे प्रसारण मध्येच खंडित केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 06:34 IST2020-11-07T05:27:58+5:302020-11-07T06:34:50+5:30
US Election 2020: ट्रम्प यांनी शुक्रवारी सायंकाळी व्हाइट हाऊसमधून देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली. भाषण सुरू असताना ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला. निवडणुकीत मोठा घोटाळा होत असल्याचे दिसते, अशी विधाने ट्रम्प यांनी केली.

US Election 2020: प्रसारमाध्यमांचा ट्रम्प यांना दणका, भाषणाचे प्रसारण मध्येच खंडित केले
वॉशिंग्टन : आपल्याविरोधात टीका करणाऱ्या प्रसारमाध्यमांना कायमच हिणवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना शुक्रवारी प्रसारमाध्यमांनी दणका दिला. ट्रम्प व्हाइट हाऊसमधून देशाला संबोधित करत असताना त्यांनी केलेल्या बेछूट आरोपांवर आक्षेप घेत अनेक वाहिन्यांनी ट्रम्प यांच्या भाषणाचे प्रसारण मध्येच खंडित केले.
ट्रम्प यांनी शुक्रवारी सायंकाळी व्हाइट हाऊसमधून देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली. भाषण सुरू असताना ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला. निवडणुकीत मोठा घोटाळा होत असल्याचे दिसते, अशी विधाने ट्रम्प यांनी केली. त्याचबरोबर एबीसी, सीबीएस, एनबीसी, एमएसएनबीसी यांसारख्या नामवंत वृत्तवाहिन्यांनी ट्रम्प यांच्या भाषणाचे प्रसारण मध्येच खंडित केले.
ट्रम्प यांच्या आरोपांना कोणताही आधार नाही, ते सातत्याने खोटे बोलत आहेत, असे सांगत वृत्तवाहिन्यांनी ट्रम्प यांचे भाषण पुढे सुरू ठेवण्यास आपण असमर्थ असल्याचे स्पष्ट केले. मात्र, फॉक्स न्यूज व सीएनएन यांनी अध्यक्षांचे संपूर्ण भाषण प्रसारित केले. मतदानामध्ये घोटाळा झाल्याचे कुठेही निदर्शनास आलेले नाही. अमेरिकेतील लोकशाहीची पायमल्ली असल्याचे सांगत वृत्तवाहिन्यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले.