US Election 2020: जो बायडेन यांना ‘अध्यक्षीय’ सुरक्षा, विजय गृहीत धरून सुरक्षारक्षकांच्या तुकड्या तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 06:34 IST2020-11-07T05:27:01+5:302020-11-07T06:34:27+5:30
US Election 2020: अध्यक्षीय निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर आली असून विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे.

US Election 2020: जो बायडेन यांना ‘अध्यक्षीय’ सुरक्षा, विजय गृहीत धरून सुरक्षारक्षकांच्या तुकड्या तैनात
वॉशिंग्टन : अध्यक्षीय निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी निर्णायक आघाडी घेतल्याचे स्पष्ट होताच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
अध्यक्षीय निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर आली असून विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या टपाली मतदानाची मोजणी अद्याप सुरू असून ती पूर्ण झाल्याखेरीज अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल लागला, असे समजले जाऊ नये, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. मात्र, बायडेन यांनी घेतलेल्या आघाडीमुळे तेच अध्यक्ष होतील, अशी चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित अध्यक्षांना जी सुरक्षाव्यवस्था पुरवली जाते, तशी सुरक्षा बायडेन यांना देण्यासाठी सिक्रेट सर्व्हिसच्या अतिरिक्त तुकड्या डेलावेअरला रवाना झाल्या आहेत.
बायडेन यांची अध्यक्षपदी निवड झाली तरी त्यांचा शपथविधी पुढील वर्षी होईल. २० जानेवारी रोजी होईल. त्यामुळे तोपर्यंत बायडेन यांची सुरक्षाव्यवस्था कडेकोट ठेवली जाईल. ट्रम्प यांनी आडमुठे धोरण अवलंबले असल्याने सत्तांतर सहजासहजी होणार नाही, असे स्पष्ट होत आहे. दरम्यान, डेलवेअर येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बायडेन मोठी घोषणा करणार असल्याचे त्यांच्या प्रचारयंत्रणेमार्फत सांगण्यात आले. त्यामुळे त्या परिसरातही सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)