अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात २० दहशतवाद्यांचा खात्मा
By Admin | Updated: July 16, 2014 23:37 IST2014-07-16T23:37:02+5:302014-07-16T23:37:02+5:30
अमेरिकेने बुधवारी पाकिस्तानच्या उत्तर वजिरिस्तानात केलेल्या ड्रोन हल्ल्यात २० दहशतवाद्यांचा खात्मा झाला. तालिबानचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर याच भागामध्ये कारवाई करत आहे

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात २० दहशतवाद्यांचा खात्मा
इस्लामाबाद : अमेरिकेने बुधवारी पाकिस्तानच्या उत्तर वजिरिस्तानात केलेल्या ड्रोन हल्ल्यात २० दहशतवाद्यांचा खात्मा झाला. तालिबानचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर याच भागामध्ये कारवाई करत आहे. मानवरहित विमानांनी दताखेल भागात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य बनविले. ड्रोन विमानातून चार क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला, असे एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले. प्राथमिक माहितीनुसार १८ दहशतवादी मारले गेले आहेत.
त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. याच क्षेत्रात गेल्या एक आठवड्यात झालेला हा दुसरा ड्रोन हल्ला आहे. यापूर्वी १० जुलै रोजी करण्यात आलेल्या हल्ल्यात सात दहशतवादी मारले गेले होते.
पाकिस्तानने यापूर्वी या हल्ल्याबाबत आपणास माहिती नसल्याचे म्हटले होते. मात्र, नंतर त्याने याबाबत कडक पवित्रा घेत हा हल्ला आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे सांगितले. पाकिस्तानने यापूर्वीही ड्रोन हल्ल्याला विरोध केला आहे. पाक लष्कर ज्या भागात दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करत आहे त्याच भागात ड्रोन हल्ले होत आहेत हे उल्लेखनीय. मध्यंतरी अमेरिकेने ड्रोन हल्ले थांबवले होते. तालिबानसोबतच्या शांतता चर्चेला वाव मिळावा म्हणून अमेरिकेने हे पाऊल उचलले होते. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेने पुन्हा हल्ले सुरू केले आहेत. (वृत्तसंस्था)