"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 15:32 IST2025-10-21T14:26:05+5:302025-10-21T15:32:01+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत जुन्या वादावरुन भाष्य केले

"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
Donald Trump: ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत रेअर अर्थ मिनरल्स करारावर स्वाक्षरी केली. व्हाईट हाऊसमध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासोबत सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान डोनल्ड ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियाचे विद्यमान राजदूत आणि माजी पंतप्रधान केविन रुड यांच्यावर जाहीरपणे तीव्र शाब्दिक हल्ला चढवला. रुड यांनी भूतकाळात केलेल्या टीकेबद्दल ट्रम्प यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत "मला तुम्ही आवडत नाही, आणि कदाचित कधीही आवडणार नाहीत," असं म्हटलं. ट्रम्प यांच्या या विधानामुळे बैठक कक्षात एकच हशा पिकला, पण यामुळे जुन्या राजकीय वैमनस्य कायम असल्याचे समोर आलं.
सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये अल्बनीज आणि ट्रम्प यांच्यात 'रेअर अर्थ मिनरल्स डील' आणि पाणबुडी कराराबाबत द्विपक्षीय चर्चा सुरू होती. ही बैठक कॅबिनेट रूममध्ये सुरू असताना, एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने ट्रंप यांना रुड यांच्या पूर्वीच्या टीकेबद्दल विचारले. या प्रश्नावर ट्रम्प यांनी आधी 'मला त्याबद्दल काही माहिती नाही' असे म्हटले. पण लगेचच त्यांनी शेजारी बसलेल्या अल्बनीज यांच्याकडे वळून विचारले, ते कुठे आहेत? ते अजूनही तुमच्यासाठी काम करतात का? असं विचारलं.
अल्बनीज यांनी हसून, ट्रम्प यांच्या अगदी समोरच बसलेल्या केविन रुड यांच्याकडे बोट दाखवले. रुड यांनी हस्तक्षेप करत, "राष्ट्राध्यक्ष महोदय, ती टीका मी हे पद स्वीकारण्यापूर्वी केली होती, असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रम्प यांनी त्यांना मध्येच थांबवले आणि कठोरपणे म्हटलं, "मी देखील तुम्हाला पसंत करत नाही. तुम्ही मला आवडत नाही आणि कदाचित कधीही आवडणार नाही." ट्रम्प यांच्या या अनपेक्षित आणि थेट वक्तव्यामुळे बैठक कक्षातील अधिकारी हसले, पण या घटनेने दोन्ही देशांतील जुना तणाव समोर आला.
केविन रुड हे अल्बनीज यांच्या लेबर पक्षाचे माजी पंतप्रधान आहेत. २०२० मध्ये ट्रंप यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रुड यांनी सोशल मीडियावर त्यांच्यावर कडवट टीका केली होती. रुड यांनी ट्रंप यांना "अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी राष्ट्राध्यक्ष" आणि "पश्चिमेचा गद्दार" असे म्हटले होते. या टीका त्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये, ट्रम्प पुन्हा निवडणुकीत जिंकून आल्यानंतर, आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काढून टाकल्या होत्या.
दरम्यान, निवडणूक प्रचारादरम्यानही ट्रम्प यांनी रुड यांना घृणास्पद म्हणत ते राजदूत म्हणून जास्त काळ टिकणार नाहीत, अशी भविष्यवाणी केली होती. ट्रम्प यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बैठकीनंतर रुड यांनी वैयक्तिकरित्या ट्रम्प यांची भेट घेऊन माफी मागितली आणि ट्रंप यांनी कथितरित्या त्यांना माफ केल्याचे समजते. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांनी या घटनेला विनोद म्हणून टाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटलं, "आम्हाला हसण्याचे आवाज आले. आमची बैठक खूप यशस्वी झाली आणि याचे संपूर्ण श्रेय केविन यांना जाते."