खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 22:32 IST2025-10-23T22:31:25+5:302025-10-23T22:32:12+5:30
चीनच्या या निर्णयामुळे रशियन तेलाच्या मागणीत मोठी घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे रशियाला पर्यायी खरेदीदार शोधावे लागतील

खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
अमेरिकेने अलीकडेच रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर रोसनेफ्ट आणि लुकोइलवर नव्या निर्बंधांची घोषणा केली. युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी रशियावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने उचललेल्या या पावलामुळे आता चीन मागे हटत असल्याचे दिसून येत आहे.
माहितीनुसार, अमेरिकेच्या निर्बंधांनंतर चीनच्या सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी रशियन तेल खरेदी करणे बंद केले आहे. प्रमुख चिनी कंपन्या, पेट्रोचायना, सिनोपेक, सीएनओओसी आणि झेनहुआ ऑइल यांनी रशियन तेल आयात करणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जर हे दावे खरे असतील तर हे रशियासाठी मोठे नुकसान असू शकते आणि रशियाच्या नफ्यावर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो. रॉयटर्सने त्यांच्या रिपोर्टमध्ये हा दावा केला आहे.
चीनच्या या निर्णयामुळे रशियन तेलाच्या मागणीत मोठी घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे रशियाला पर्यायी खरेदीदार शोधावे लागतील. या उलथापालथीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. चीन दररोज सुमारे १.४ दशलक्ष बॅरल (बीपीडी) रशियन तेल समुद्रमार्गे आयात करतो, जरी यापैकी बहुतेक भाग सामान्यतः स्वतंत्र रिफायनर्सद्वारे खरेदी केला जातो. यापूर्वी अमेरिकेने अनेक महिन्यांपासून रखडलेल्या राजनैतिक मुत्सद्देगिरीमुळे आणि रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भूमिकेमुळे निराश होऊन रशियन तेल कंपन्यांवर निर्बंध लादले होते.
नाटोचे सरचिटणीस मार्क रूट यांचा पाहुणचार करताना व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, आज खूप मोठा दिवस आहे. हे खूप मोठे निर्बंध आहेत. ते दोन प्रमुख रशियन तेल कंपन्यांविरुद्ध आहेत. युद्ध आता संपेल अशी आम्हाला आशा आहे. आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेपणास्त्रांबद्दल आणि ज्या इतर गोष्टींवर बोललो आहोत त्यावर विचार करत आहोत. परंतु आम्हाला वाटत नाही की आता ते आवश्यक असेल असं त्यांनी सांगितले. त्याशिवाय आता वेळ आली आहे. आम्ही बराच वेळ वाट पाहिली आहे असं ट्रम्प यांनी निर्बंध इतके कठोर का आहेत या पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर दिले.