US Attack in Syria:सीरियामध्ये इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेविरोधात अमेरिकेने आपली लष्करी कारवाई तीव्र केली आहे. अमेरिकन सेंट्रल कमांड(CENTCOM)ने ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’ अंतर्गत सुरू असलेल्या मोहिमेचा नवा व्हिडीओ आणि तपशील सार्वजनिक केला आहे. ही कारवाई डिसेंबरमध्ये पलमायरा येथे झालेल्या हल्ल्यानंतर सुरू करण्यात आली असून, त्या हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिक आणि एका अमेरिकन दुभाष्याचा मृत्यू झाला होता.
पलमायरा हल्ल्यानंतर सुरू झाले ऑपरेशन
CENTCOM च्या माहितीनुसार, हे ऑपरेशन 19 डिसेंबर 2025 पासून सुरू झाले. 13 डिसेंबरला पलमायरा येथे झालेल्या गोळीबारात सहभागी असलेला हल्लेखोर नुकताच सीरियन सुरक्षा दलात भरती झाल्याचे समोर आले होते. तसेच त्याचे कट्टरपंथी संघटनांशी संबंध असल्याची माहितीही उघड झाली. हल्ल्यानंतर त्या व्यक्तीला घटनास्थळीच ठार मारण्यात आले. अमेरिकन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना प्रत्युत्तर देणे आणि ISIS पुन्हा संघटित होऊ नये यासाठीच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
फेब्रुवारीमध्ये 10 अचूक हवाई हल्ले
CENTCOM च्या माहितीनुसार, 3 ते 12 फेब्रुवारीदरम्यान मोहिमेच्या नव्या टप्प्यात 10 अचूक हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये ISIS शी संबंधित 30 हून अधिक ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. यामध्ये शस्त्रसाठा केंद्रे, दळणवळण व्यवस्था आणि रसद पुरवठा केंद्रांचा समावेश असून, ही ठिकाणे संघटनेच्या कारवायांसाठी महत्त्वाची होती.
आधुनिक युद्धविमानांचा वापर
या लष्करी कारवाईत अमेरिकेने F-15E स्ट्राइक ईगल, A-10 वॉर्थॉग, AC-130J घोस्टरायडर, तसेच MQ-9 रीपर ड्रोन यांचा वापर केला. याशिवाय जॉर्डनच्या F-16 विमानांनी देखील मोहिमेत सहकार्य केले. अधिकाऱ्यांच्या मते, ऑपरेशन सुरू झाल्यापासून आतापर्यंत किमान 50 ISIS दहशतवादी ठार किंवा अटक करण्यात आली आहे.
5,700 ISIS संशयितांना इराकमध्ये हलवले
प्रदेशात स्थैर्य राखण्यासाठी अमेरिका आणि तिच्या सहयोगींनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सेंटकॉमनुसार, सीरियातील तुरुंगांमध्ये बंद असलेल्या 5,700 हून अधिक ISIS संशयितांना इराकमध्ये हलवण्यात आले आहे. यामुळे तुरुंगफोडीचा धोका कमी होईल आणि ISIS पुन्हा ताकद एकवटण्याची शक्यता रोखता येईल, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे.
ISIS पुन्हा सक्रिय होऊ नये, हेच अमेरिकेचे ध्येय
सीरियामधील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ISIS पुन्हा उभारी घेऊ नये, हीच अमेरिकेची प्रमुख रणनीती असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’ ही त्या दीर्घकालीन रणनीतीचाच एक भाग आहे, असे सेंटकॉमने नमूद केले आहे.
Web Summary : America intensified military action against ISIS in Syria after an attack killed American soldiers. Operation Hawk Eye Strike destroyed over 30 ISIS locations, including weapon caches. 5,700 ISIS suspects were moved to Iraq.
Web Summary : सीरिया में ISIS के खिलाफ अमेरिकी सैन्य कार्रवाई तेज, अमेरिकी सैनिकों पर हमले का बदला। 'ऑपरेशन हॉक आई स्ट्राइक' में 30 से अधिक ISIS ठिकाने नष्ट, हथियार भंडार शामिल। 5,700 संदिग्ध इराक स्थानांतरित।