अंधाऱ्या रात्री अमेरिकन हवाई दलाचा अचानक हल्ला; येमेनमधील हुती बंडखोरांवर एअर स्ट्राईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 08:46 IST2025-03-16T08:46:31+5:302025-03-16T08:46:54+5:30
हुतीद्वारे संचलित आरोग्य मंत्रालयाने या हल्ल्यात १९ लोकांचा मृत्यू झाला असून नऊ जखमी झाल्याचे सांगितले आहे.

अंधाऱ्या रात्री अमेरिकन हवाई दलाचा अचानक हल्ला; येमेनमधील हुती बंडखोरांवर एअर स्ट्राईक
अमेरिकेने शनिवारी रात्री येमेनमध्ये ईराण समर्थित हुती बंडखोरांवर जोरदार हल्ले चढविले आहेत. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेने केलेला हा पहिला हल्ला आहे. लाल समुद्रात हुती बंडखोर व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करत आहेत. यामुळे ट्रम्प यांच्या आदेशावरून हा हल्ला करण्यात आला आहे.
हुतीद्वारे संचलित आरोग्य मंत्रालयाने या हल्ल्यात १९ लोकांचा मृत्यू झाला असून नऊ जखमी झाल्याचे सांगितले आहे. येमेनची राजधानी सनावर हा हल्ला करण्यात आला आहे. हुतींनी हा हल्ला युद्ध गुन्हा असल्याचे म्हटले आहे. तसेच अमेरिकेचे हल्ले उत्तरी प्रांत सादापर्यंत सुरु होते असेही म्हटले आहे. आमचे लष्कर या हल्ल्यांचे प्रत्यूत्तर देण्यास समर्थ असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
जर हुती बंडखोरांनी हल्ले बंद केले नाहीत तर नरकाचा असा पाऊस पाडू की कधी पाहिला नसेल असा इशारा अमेरिकेने दिला आहे. तसेच इराणने हुतींना समर्थन देणे बंद करावे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. कोणतीही दहशतवादी संघटना अमेरिकन व्यावसायिक आणि नौदल जहाजांना जगातील जलमार्गांवरून मुक्तपणे जाण्यापासून रोखू शकत नाही, असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
सना विमानतळावर काळ्या धुराचे लोट दिसत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी येमेनची राजधानी सना येथे हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते. येमेनचा बराचसा भाग हुतींच्या ताब्यात आहे. या बंडखोरांनी नोव्हेंबर २०२३ पासून जहाजांवर १०० हून अधिक हल्ले केले आहेत. यामुळे जागतिक व्यापार विस्कळीत झाला आहे. यामुळे अमेरिकेला लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे डागण्यास भाग पडले आहे.