लंडन : जागतिक कीर्तीचे बौद्ध विद्वान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरुबंधू आणि त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक उर्गेन संघरक्षित यांचे मंगळवारी सकाळी १० वाजता लंडनच्या हेरेफोर्ड रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. न्यूमोनिया झाल्याने त्यांना रविवारी रुणालयात दाखल करण्यात आले होते. लंडनजवळच्या कॉडिंग्टन कोर्ट येथील ‘अधिष्ठान’मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.मूळचे ब्रिटिश असलेले संघरक्षित (डेनिस लिंगहूड) यांचा जन्म २६ आॅगस्ट १९२५ रोजी लंडन येथे झाला. वयाच्या १७ व्या वर्षी ते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सैनिक म्हणून भारतात आले होते. युद्ध संपल्यानंतर ते बौद्धधम्माचा अभ्यास करण्यासाठी २० वर्षांपर्यंत भारतातच राहिले. उ. चंद्रमणी आणि भिक्खू जगदीश काश्यप यांच्या हस्ते त्यांनी दीक्षा घेतली. ‘सर्व्हे आॅफ बुद्धिझम’, ‘रिव्हॉल्यूशन आॅफ डॉ. आंबेडकर’ आणि ‘नो युवर मार्इंड’ यासारख्या जवळपास १२५ पुस्तकांचे लेखक संघरक्षित यांनी डॉ. आंबेडकरांशी तीनवेळा भेट घेऊन धम्म चळवळीवर चर्चा केली होती. (वृत्तसंस्था)
जागतिक कीर्तीचे बौद्धविद्वान उर्गेन संघरक्षित यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 03:06 IST