विशेष लेख: उत्खननात सापडले २३०० वर्षांपूर्वीचे ‘बळी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 10:13 IST2025-09-06T10:12:21+5:302025-09-06T10:13:36+5:30

पेरूच्या उत्तर-पश्चिम किनाऱ्यावरील पुएमापे मंदिर परिसरात नुकतंच उत्खनन करण्यात आलं. त्यादरम्यान या अवस्थेतील विचित्र कबरी सापडल्या आहेत.

'Unusual' burial rituals discovered in 2,300-year-old tomb leave archaeologists baffled | विशेष लेख: उत्खननात सापडले २३०० वर्षांपूर्वीचे ‘बळी’

विशेष लेख: उत्खननात सापडले २३०० वर्षांपूर्वीचे ‘बळी’

हात मागे गच्च बांधलेले, गळ्यात दोरांचे फास.. तोंड जमिनीत खुपसलेलं... असे समारे एक डझनपेक्षा जास्त लोक. सगळेच मृत. अर्थातच हे सगळेच सांगाडे!.. पेरूच्या उत्तर-पश्चिम किनाऱ्यावरील पुएमापे मंदिर परिसरात नुकतंच उत्खनन करण्यात आलं. त्यादरम्यान या अवस्थेतील विचित्र कबरी सापडल्या आहेत. या कबरींमध्ये एक डझनहून अधिक लोकांचे मृतदेह पुरलेले आहेत. हे सगळेच सांगाडे अंदाजे २३०० वर्षांपूर्वीचे असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. पण हा सारा प्रकार पाहिल्यावर सर्वसामान्य माणसंच काय, संशोधकही हादरले आहेत. संशोधकांच्या अंदाजानुसार या सगळ्याच लोकांना ‘बळी’ दिलं गेलेलं असावं. कुठल्यातरी कारणासाठी त्यांना ‘जिवंत समाधी’ दिली गेली असावी.

परिसरातील सर्वसामान्य लोकांची मात्र हे पाहून पाचावर धारण बसली आहे. त्यांच्या मते हा प्रकार काहीतरी जादूटोण्याचा किंवा काळ्या जादूचा असावा. शास्त्रज्ञांनी अशा गोष्टींशी कुठलीही छेडछाड करू नये. जे आहे तसंच राहू द्यावं. आता तिथे जास्त उकरण्याचा किंवा उत्खनन करण्याचा प्रयत्न करू नये. नाहीतर ही ‘काळी जादू’ इथल्या लोकांच्या जीवावर उठू शकते..

पुरातत्वज्ञांच्या मते, या कबरींमध्ये काही दुर्मिळ वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या अभ्यास केलाच गेला पाहिजे. सॅन मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्राचे प्राध्यापक आणि उत्खनन करणाऱ्या पथकाचे प्रमुख हेन्री टँटालियन म्हणतात, हे मृतदेह ज्या प्रकारे कबरीत ठेवले होते, ते अत्यंत विचित्र आहे. त्यांचे चेहरे जमिनीच्या दिशेने होते, जे अत्यंत अपवादात्मक आहे. मृतदेह कधीच अशा प्रकारे ठेवले जात नाहीत. यावरून हा मानवी बळींचाच प्रकार वाटतो.
 
टँटालियन यांनी सांगितलं, अनेक मृतांच्या कवट्यांमध्ये फ्रॅक्चर होतं. काहींच्या गळ्यात दोऱ्या होत्या आणि हात मागे बांधलेले होते. यावरून स्पष्ट होतं  की या लोकांची बलिदानासाठी हत्या करण्यात आली होती. या कबरींमध्ये कोणतीही भेटवस्तू किंवा धार्मिक वस्तू सापडली नाही, जे अत्यंत असामान्य आहे. ज्या मंदिर परिसरात हे उत्खनन करण्यात आलं, ते पुएमापे मंदिर सुमारे ३००० वर्षं जुनं आहे. 

टँटालियन यांच्या पथकानं गेल्या वर्षी २०२४ साली मंदिर परिसराजवळ या कबरी शोधून काढल्या आणि २०२५ मध्ये उत्खनन सुरू केलं. मंदिर जरी सुमारे ३००० वर्षं पुरातन असलं तरी या कबरी मात्र यानंतरच्या काळातील म्हणजे अंदाजे इसवी सनपूर्व ४०० ते २०० या काळातील आहेत. मानवी बलिदान सुरू होण्यापूर्वीच हे मंदिर सोडलं गेलं असावं, असाही अंदाज आहे.

तज्ज्ञ आता या मृत लोकांचे डीएनए तपासत आहेत. ज्या लोकांचे सांगाडे येथे सापडले आहेत, त्यांना या प्राचीन पूजास्थळी बलिदानासाठी चढवले गेले असावे, याबाबत तज्ज्ञांमध्ये जवळपास एकमत आहे, बलिदान दिले गेलेले हे लोक कोण होते, हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. हे लोक कदाचित इथल्याच परिसरातील, आसपास राहणारे असावेत, पण सांगाड्यांचं विश्लेषण सुरू असून, डीएनए चाचणीनंतर त्यावर अधिक प्रकाश पडेल. मंदिर परिसरात सापडलेली मातीची भांडी, प्राणी आणि वनस्पतींचंही विश्लेषण सुरु आहे.

Web Title: 'Unusual' burial rituals discovered in 2,300-year-old tomb leave archaeologists baffled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.