उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांची पसंती अमेरिकेलाच; ओपन डोअर्सचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 16:55 IST2021-11-15T16:55:04+5:302021-11-15T16:55:24+5:30
मेरिकेनं शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये २०० ठिकाणांहून आलेल्या ९ लाख १४ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचं अहवाल सांगतो. यापैकी भारतीय विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६७ हजार ५८२ इतकी आहे.

उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांची पसंती अमेरिकेलाच; ओपन डोअर्सचा अहवाल
नवी दिल्ली: शिक्षणासाठी अमेरिका आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची पहिली पसंती ठरली आहे. ओपन डोअर्स २०२१च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. अमेरिकेनं शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये २०० ठिकाणांहून आलेल्या ९ लाख १४ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचं अहवाल सांगतो. यापैकी भारतीय विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६७ हजार ५८२ इतकी आहे.
कोविड-१९ महामारीच्या काळातही अमेरिकेचे दरवाजे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी उघडे होते. गेल्या वर्षी अमेरिकन सरकार आणि अमेरिकेतील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी सुरू केली. प्रत्यक्ष वर्ग, ऑनलाईन आणि हायब्रीड शिक्षण प्रकारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नीट काळजी घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधी आणि संसाधनं कमी होणार नाहीत याची काळजी घेतली गेली.
जागतिक महामारी असतानाही भारतीय विद्यार्थी अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करून अमेरिकेत येऊ शकत होते, असं दूतावास व्यवहार मंत्री डॉन हेल्फिन यांनी सांगितलं. 'आम्ही एकट्या उन्हाळ्यात ६२ हजार विद्यार्थ्यांना व्हिसा दिले. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती अमेरिकेलाच असल्याचं यातून अधोरेखित होतं. भारतीय विद्यार्थ्यांचं अमेरिकेत जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं, यासाठी येत्या वर्षांत यापेक्षा अधिक व्हिसा जारी करण्याचा आमचा मानस आहे,' असं हेल्फिन म्हणाले.
उच्च शिक्षण, व्यवहारिक ज्ञान देण्याचं काम अमेरिका करते. जागतिक अर्थव्यवस्थेत विद्यार्थ्यांना पुढे ठेवणारा अनुभव इथे मिळतो, असं मत सांस्कृतिक आणि शैक्षणिक सल्गार अँथॉनी मिरांडा यांनी व्यक्त केलं. आमच्यासाठी भारतीय विद्यार्थी महत्त्वाचे आहेत. त्यांच्यासोबत आमचे आयुष्यभराचे संबंध निर्माण होतात. सध्याच्या आणि भविष्यातील जागतिक आव्हानांना आपणं सोबतीनं सामोरं जातो, असं मिरांडा म्हणाले.