अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:48 IST2025-12-15T12:47:51+5:302025-12-15T12:48:59+5:30
Boeing 777 Engine Failure Take Off: जपानला २७५ प्रवाशांना घेऊन जाणारे युनायटेड एअरलाइन्सचे बोईंग ७७७-२०० या विमानाचे टेक ऑफवेळी इंजिनच बंद पडले.

अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
काही महिन्यांपूर्वी अहमदाबादमध्ये विमान उड्डाण करत असताना एअर इंडियाचे विमानाचे इंजिन बंद पडून मोठा अपघात झाला होता. तशीच घटना अमेरिकेच्या डलेस विमानतळावर घडता घडता राहिली आहे. जपानला २७५ प्रवाशांना घेऊन जाणारे युनायटेड एअरलाइन्सचे बोईंग ७७७-२०० या विमानाचे टेक ऑफवेळी इंजिनच बंद पडले. वैमानिकांनी तातडीने यु-टर्न घेत या विमानाचे आपत्कालीन लँडिंग केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
या विमानामध्ये २७५ प्रवासी आणि १५ क्रू सदस्य असे २९० जण होते. हे विमान अमेरिकेहून जपानला जाण्यासाठी निघाले होते. विमानाने आकाशात झेप घेत असतानाच, अचानक विमानाचे एक इंजिन बंद पडले. धोका लक्षात येताच वैमानिकांनी तात्काळ आपत्कालीन स्थिती घोषित केली आणि सर्व सुरक्षा मानकांचे पालन करत विमानाला नियंत्रित केले. क्रू मेंबर्सच्या मदतीने वैमानिकांनी विमानाला यू-टर्न घेऊन पुन्हा सुरक्षितपणे डलेस विमानतळावर उतरवले.
यावेळी, इंजिन बंद पडल्यामुळे रनवेवर थोड्या प्रमाणात आग लागल्याचीही घटना घडली, पण अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने ती विझवली. कोणतीही जीवितहानी न होता सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. युनायटेड एअरलाइन्स कंपनीने वैमानिक आणि क्रू सदस्यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले आहे. या गंभीर घटनेची नोंद घेत अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने इंजिनमधील बिघाडाच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. या विमानाच्या डेटा रेकॉर्डर आणि मेंटेनन्स लॉगची कसून तपासणी केली जात आहे.
या घटनेमुळे अनेकांना अहमदाबाद विमानतळावरील एअर इंडियाच्या विमान अपघाताची आठवण झाली. या विमानाची दोन्ही इंजिन उड्डाण करताच बंद पडली होती. यामुळे वैमानिकांकडे विमानाला थ्रस्ट देण्यासाठी वेळच नव्हता. हे विमान रहिवासी इमारतींवर कोसळले होते. यामुळे मृतांची संख्या वाढली होती.