अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 10:34 IST2025-07-12T10:34:19+5:302025-07-12T10:34:47+5:30
गाझा पट्टीमध्ये मदत वाटप केंद्रांजवळ गेल्या सहा आठवड्यांत तब्बल ७९८ लोकांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक अहवाल संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने प्रसिद्ध केला आहे.

अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
गाझा पट्टीमध्ये मदत वाटप केंद्रांजवळ आणि मदत गटांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये गेल्या सहा आठवड्यांत तब्बल ७९८ लोकांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक अहवाल संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने (OHCHR) प्रसिद्ध केला आहे. यातील बहुतांश मृत्यू गोळी लागल्याने झाल्याचे समोर आले असून, संयुक्त राष्ट्रांनी या परिस्थितीला मानवतेच्या मूल्यांचे उल्लंघन, असे म्हटले आहे.
'गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊंडेशन'च्या मदत केंद्रांजवळ ६१५ मृत्यू
OHCHRच्या अहवालानुसार, मृतांपैकी ६१५ मृत्यू अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या पाठिंब्याने कार्यरत असलेल्या गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊंडेशनच्या (GHF) मदत केंद्रांच्या परिसरात झाले आहेत. तर, उर्वरित १८३ मृत्यू इतर मदत गटांच्या काफिल्यांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये झाले आहेत. "बहुसंख्य जखमींना गोळी लागल्याने दुखापत झाली आहे," असे OHCHRने स्पष्ट केले आहे, जे मानवतावादी तटस्थतेच्या मानकांचे उल्लंघन दर्शवते. संयुक्त राष्ट्रांनी गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊंडेशनच्या मदत वाटप मॉडेलला असुरक्षित ठरवले असून, त्याचा संबंध अत्याचार आणि गुन्हेगारी कृत्यांशी जोडला आहे.
गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊंडेशनकडून संयुक्त राष्ट्रांचे आकडे खोटे असल्याचा दावा
या अहवालावर गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊंडेशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रांचे आकडे खोटे आणि दिशाभूल करणार असल्याचा दावा केला आहे. उलट, सर्वाधिक प्राणघातक हल्ले संयुक्त राष्ट्रांच्याच काफिल्यांशी संबंधित असल्याचे गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊंडेशनचे म्हणणे आहे. गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊंडेशनने गेल्या पाच आठवड्यांत गाझामध्ये ७ कोटींहून अधिक खाद्य पॅकेट्स वाटल्याचा दावा केला आहे, तर इतर मानवतावादी गटांची मदत हमास किंवा गुन्हेगारी टोळ्यांनी लुटल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, संयुक्त राष्ट्रांनी मदत लुटीच्या घटनांना दुजोरा दिला आहे. जागतिक अन्न कार्यक्रमाने (World Food Programme) दिलेल्या माहितीनुसार, गाझामध्ये अन्न घेऊन जाणारे बहुतेक ट्रक भुकेल्या लोकांनी अडवले.
इस्रायलकडून सुरक्षा उपायांचे दावे, पण गाझामध्ये तीव्र टंचाई
इस्रायलने आपल्या लष्करी कारवायांदरम्यान हमासच्या हातात मदत पुरवठा जाण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करत असल्याचे म्हटले आहे, ज्यात कुंपण आणि चिन्हे लावणे इत्यादींचा समावेश आहे. मात्र, गाझामध्ये २१ महिन्यांपासून सुरू असलेल्या लष्करी कारवाईमुळे अन्न आणि इतर मूलभूत पुरवठ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. २३ लाख लोकसंख्येपैकी बहुसंख्य लोक विस्थापित झाले आहेत. OHCHRने मदत मिळवण्याच्या प्रयत्नात मारल्या गेलेल्या लोकांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून या हिंसक घटनांमागील कारणे समोर येऊ शकतील.