युनोची सुरक्षा परिषद : भारताला चार कायम सदस्यांचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:04 IST2020-09-22T05:04:38+5:302020-09-22T05:04:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या पाच कायम सदस्यांपैकी चार जणांनी परिषदेत कायमचे स्थान मिळण्यासाठी ...

युनोची सुरक्षा परिषद : भारताला चार कायम सदस्यांचा पाठिंबा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या पाच कायम सदस्यांपैकी चार जणांनी परिषदेत कायमचे स्थान मिळण्यासाठी भारताच्या उमेदवारीला उभयपक्षी पाठिंबा दिला आहे, असे लोकसभेत सोमवारी सरकारने सांगितले.
एका प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या विस्तारीत सुरक्षा परिषदेत कायमचे सदस्यत्व मिळण्यासाठी भारताला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले आहे. पाच कायम सदस्यांपैकी चार सदस्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विस्तारीत सुरक्षा परिषदेत भारताला सदस्यत्व मिळण्यासाठी त्याच्या उमेदवारीला अधिकृतपणे द्विपक्षीय अनुमोदन दिले आहे, असे मुरलीधरन म्हणाले. मात्र त्यांनी त्या चार सदस्य देशांची नावे सांगितली नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये चीनला भेट दिली होती. त्यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले होते की, ‘‘आंतरराष्ट्रीय व्यवहारांत भारताच्या दर्जाला एक मोठा विकसनशील देश म्हणून मोठे महत्व आहे आणि सुरक्षा परिषदेसह संयुक्त राष्ट्रांत मोठी भूमिका बजावण्याच्या भारताच्या आकांक्षांना समजून घेऊन पाठिंबा आहे.’’ सध्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाच कायम व दहा कायम नसलेले सदस्य आहेत.