Nithyananda Kailasa in UN : फरार बाबा नित्यानंदच्या 'कैलासा'ला UN चा झटका; प्रस्ताव धुडकावून लावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 13:33 IST2023-03-03T13:33:26+5:302023-03-03T13:33:42+5:30
गेल्या आठवड्यात तथाकथित 'कैलासा'च्या प्रतिनिधींनी UN च्या बैठकीत हजेरी लावली होती.

Nithyananda Kailasa in UN : फरार बाबा नित्यानंदच्या 'कैलासा'ला UN चा झटका; प्रस्ताव धुडकावून लावला
UN Dismisses Submissions by Nithyananda Kailasa : भारतातील फरार बाबा नित्यानंदने स्थापन केलेल्या तथाकथित 'युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा' (USK) च्या प्रतिनिधींनी गेल्या आठवड्यात UN च्या बैठकीत हजेरी लावली होती. याचा फोटोही नित्यानंदने ट्विटरवरुन शेअर केला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर भारतामध्ये त्याचे पडसाद उमटले. दरम्यान, यावर आता संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने (UN human rights office) गुरुवारी स्पष्टीकरण दिले आहे.
त्यांनी सांगितले की, तथाकथित कैलासाच्या प्रतिनिधींनी जिनिव्हामध्ये भेट दिली आणि प्रस्ताव मांडला होता. पण, त्यांच्या मागणीवर कोणताही विचार केला जाणार नाही. दोन सार्वजनिक सभांमध्ये 'कैलासा' चे प्रतिनिधी आले, पण मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाने त्यांना प्रसिद्धी सामग्री वितरीत करण्यापासून रोखले. तसेच, त्यांच्या भाषणाकडे दुर्लक्षही केले.
OHCHR च्या प्रवक्त्याने सांगितले की, बैठक सर्वांसाठी खुली होती, त्यामुळे 'कैलास'च्या लोकांना त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. अशा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नोंदणी स्वयंसेवी संस्था आणि सामान्य लोकांसाठी खुली आहे. या व्यासपीठावर कोणीही आपले मत सादर करू शकतो. त्यांच्या विश्वासार्हतेच्या आधारावर संस्था पुढील कारवाई ठरवते. 24 फेब्रुवारीला मंच लोकांसाठी खुला झाला तेव्हा 'कैलाश'च्या प्रतिनिधीने सर्वसाधारण चर्चेत थोडक्यात भाष्य केले. त्यांचा मुद्दा वरवरचा होता, त्यामुळे समिती त्यावर विचार करणार नाही.