युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:47 IST2025-10-27T15:46:55+5:302025-10-27T15:47:11+5:30
Russia Ukraine War: रशियाची राजधानी मॉस्कोवर ३४ ड्रोनने हल्ला

युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्यापही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. तशातच युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. रशियन अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की युक्रेनने २६-२७ ऑक्टोबरच्या रात्री मॉस्कोवर मोठा ड्रोन हल्ला केला. मॉस्कोवर ३४ ड्रोनच्या माध्यमातून गोळीबार करण्यात आला. रविवारी रात्री स्थानिक वेळेनुसार रात्री १० वाजता सुरू झालेले हे ड्रोन हल्ले पाच तास चालले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाने सोमवारी सांगितले की त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालींनी रात्रीतून १९३ युक्रेनियन ड्रोन नष्ट केले गेले, ज्यात ३४ मॉस्कोला लक्ष्य करणारे आणि ४७ ब्रायन्स्क प्रदेशात होते. या हल्ल्यांमुळे मॉस्कोचे डोमोडेडोम आणि झुकोव्स्की विमानतळ काही काळासाठी बंद करावे लागले.
हल्ल्यात एकाचा मृत्यू
या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाला आणि पाच जण जखमी झाले. रशियाच्या नैऋत्येकडील ब्रायन्स्क येथे युक्रेनियन ड्रोनने एका मिनीबसला धडक दिली, ज्यामध्ये चालकाचा मृत्यू झाला. त्याच बसमधील पाच प्रवासीही जखमी झाले, असे प्रादेशिक गव्हर्नर अलेक्झांडर बोगोमाझ यांनी टेलिग्राम अँपवर सांगितले. मॉस्को आणि ब्रायन्स्क प्रदेशात नष्ट केलेल्या ड्रोन व्यतिरिक्त, रशियन प्रणालींनी देशाच्या पश्चिम आणि दक्षिणेकडील इतर ११ प्रदेशांमध्ये ड्रोन पाडले, असे रशियन संरक्षण मंत्रालयाने टेलिग्रामवरील त्यांच्या दैनिक अहवालात म्हटले आहे.
मॉस्को विमानतळ बंद
रशियाचे अध्यक्ष आणि मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी टेलिग्रामवर घोषणा केली की मॉस्कोवरून उडणारे ड्रोन सहा तासांच्या आत पाडण्यात आले. हल्ल्यामुळे, हवाई सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मॉस्कोच्या चार विमानतळांपैकी दोन, डोमोडेडोवो विमानतळ आणि लहान झुकोव्स्की विमानतळ, सुमारे अडीच तासांसाठी बंद ठेवण्यात आले.
युक्रेनकडून हल्ल्यावर कोणतीही प्रतिक्रिया नाही...
रशियावर युक्रेनने हल्ला केल्याचा दावा केला असला तरी, युक्रेनकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. यापूर्वी, अल जझीराने वृत्त दिले होते की युक्रेनियन हवाई दलाने दावा केला होता की रशियाने रविवारी रात्री युक्रेनवर १०१ ड्रोन हल्ले केले, त्यापैकी ९० ड्रोन पाडण्यात आले आणि निष्क्रिय करण्यात आले.