खुन्नस देत ट्रम्पशी भिडले, पण आता घेतली माघार, युक्रेनमधील खजिना अमेरिकेला देण्यास झेलेन्स्की तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 15:58 IST2025-03-03T15:57:32+5:302025-03-03T15:58:01+5:30
Ukraine-America Mineral Deal Update: व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भिडणारे झेलेन्स्की यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. तसेच अमेरिकेसोबत खनिजांसाठीचा करार करण्याची तयारी दर्शवली आहे.

खुन्नस देत ट्रम्पशी भिडले, पण आता घेतली माघार, युक्रेनमधील खजिना अमेरिकेला देण्यास झेलेन्स्की तयार
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये परवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदोमिर झेलेन्स्की यांच्यात वादावादी झाली होती. दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही खडाजंगी आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भिडणारे झेलेन्स्की यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. तसेच अमेरिकेसोबत खनिजांसाठीचा करार करण्याची तयारी दर्शवली आहे. रविवारी लंडनमध्ये झालेल्या युरेपियन नेत्यांच्या बैठकीत युक्रेनला मिळालेल्या पाठिंब्यानंतर झेलेन्स्की यांनी याबाबत संकेत दिले आहे.
झेलेन्स्की म्हणाले की, आम्ही खनिज करारावर स्वाक्षरी करण्याची सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आम्ही त्या करारावर स्वाक्षरी करण्यात तयार आहोत. जर दोन्ही पक्ष राजी असतील, तर करारावर सह्या केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. मात्र दोन्ही पक्षांकडून तयार करण्यात आलेल्या कराराला कायम ठेवण्यास अमेरिका तयार आहे की, नाही याची माहिती मात्र समोर आलेली नाही.
अमेरिकेचे एक उच्चपदस्थ अधिकारी स्कॉट बेसेंट यांनी सांगितले की, झेलेन्स्की यांना युद्ध सुरू ठेवायचं असेल, तर हा करार निरर्थक ठरेल. झेलेन्स्की यांनी रशियासोबतचं युद्ध संपुष्टात आणण्यापूर्वी युक्रेनच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी केली आहे. यादरम्यान फ्रान्स आणि ब्रिटनने शांततेच्या प्रयत्नांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आग्रही भूमिका घेतल्याचं दिसत आहे. मात्र याबाबत झेलेन्स्की शंका उपस्थित केली आहे.
दरम्यान, इंग्लंडचे पंतप्रधान स्टार्मर यांनी सांगितले की, मी, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रौ आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदोमीर झेलेन्स्की यांच्यासोबत मिळून एक शांतता प्रस्ताव तयार करणार आहे. तसेच हा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर ठेवण्यात येईल. इंग्लंड आणि फ्रान्स आणि इतर दोन देश युक्रेनसोबत मिळून लढाई थांबवण्याच्या योजनेवर काम करणार आहोत. तसेच त्यानंतर या योजनेबाबत अमेरिकेशी चर्चा केली जाईल.