बांगलादेशमध्ये 299 जागांसाठी मतदान झाले आणि निकालही जाहीर झाले. २९९ जागांपैकी बीएनपी पक्षाने दोन तृतीयांश जागा जिंकल्या. पक्षाचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी दोन मतदारसंघातून विजय मिळवला. राजकीय अस्थिरता निर्माण झालेल्या बांगलादेशात पुन्हा सत्तांतर झाले आहे. पण, बांगलादेशात मतदान प्रक्रिया वेगळी आहे. तिथे ईव्हीएम नाही, तर मतपत्रिकेवर मतदान होते.
बांगलादेशातील मतदान प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे मतदारांना दोन मतपत्रिका दिल्या गेल्या. त्याचबरोबर भारतात अंगठ्या शेजारच्या बोटाला किंवा मधल्या बोटाला शाई लावली जाते. बांगलादेशात अंगठ्याला शाई लावली जाते आणि तीही पूर्णपणे त्वचेवर आडवी लावली जाते.
बांगलादेशात दोन मतपत्रिका का दिल्या?
बांगलादेशमध्ये मतदान करताना मतदारांना दोन मतपत्रिका दिल्या जातात. एका मतपत्रिकेवर उमेदवारांची नावे आणि त्यांची निवडणूक चिन्हे असतात. ज्या उमेदवाराला मतदान करायचे आहे, त्यावर शिक्का मारावा लागतो.
दुसऱ्या मतपत्रिकेवर लोकांचा कौलही घेतला गेला आहे. जुलै चार्टरच्या बाजूने आहात की नाही? याबद्दल लोकांचे मतदान घेतले गेले. चार्टरद्वारे राष्ट्रपतींचे अधिकार वाढवण्यासह इतर काही मोठे बदल करण्याचा प्रस्ताव आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सत्तेत आलेली बीएनपी या बाजूने नाहीये. जमात ए इस्लामी आणि नॅशनल सिटीजन्स पार्टी हे बदल केले जावे, या मतांची आहे.
शेख हसीना, खलिदा झियांशिवाय निवडणूक
बांगलादेशामध्ये चार दशकांनंतर पहिल्यांदा अशी निवडणूक होत आहे, त्यात बांगलादेशातील सर्वात शक्तिशाली असलेल्या महिलांचे फोटो दिसले नाहीत. खालिदा झिया यांचे अलिकडे निधन झाले, तर शेख हसीना यांना पंतप्रधान पद सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला.