ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 15:20 IST2025-09-20T15:20:12+5:302025-09-20T15:20:35+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या H-1B व्हिसासंदर्भातील नव्या नियमांमुळे अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Trump's decision has increased the fear of Indians in America; Microsoft sends urgent email to employees | ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल

ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या H-1B व्हिसासंदर्भातील नव्या नियमांमुळे अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हा नियम लागू होण्यापूर्वीच, अमेरिकेतील दिग्गज आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टने तिच्या H-1B व्हिसाधारक कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि तातडीचा ई-मेल पाठवला आहे. या ई-मेलमध्ये, कंपनीने भारतात असलेल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत २१ सप्टेंबरपर्यंत अमेरिकेत परत येण्याचे आदेश दिले आहेत.

नेमका नियम काय आहे?
ट्रम्प यांच्या नव्या नियमानुसार, २१ सप्टेंबर २०२५ पासून अमेरिकन कंपन्यांना परदेशी कर्मचाऱ्यांच्या प्रवेशासाठी किंवा पुन्हा प्रवेशासाठी प्रत्येक H-1B अर्जावर १ लाख डॉलर (सुमारे ८८.१० लाख रुपये) शुल्क भरावे लागेल. या नियमाचा फटका H-1B व्हिसा असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बसणार आहे. जर एखादा H-1B व्हिसाधारक कर्मचारी भारतात सुट्टीवर आला असेल, तर त्याला पुन्हा अमेरिकेत परत जाण्यासाठी कंपनीला हे शुल्क भरावे लागेल. जोपर्यंत कंपनी हे शुल्क देत नाही, तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याला अमेरिकेत प्रवेश दिला जाणार नाही.

मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना काय सांगितले?
सूत्रांनुसार, मायक्रोसॉफ्टने अंतर्गत सूचना जारी करत म्हटले आहे की, २१ सप्टेंबरनंतर अमेरिकेबाहेर असलेल्या कोणत्याही H-1B कर्मचाऱ्याला परत येण्याची परवानगी दिली जाणार नाही, जोपर्यंत त्यांच्या कंपनीकडून १ लाख डॉलर शुल्क भरले जात नाही. कंपनीने असेही म्हटले आहे की, हे शुल्क फक्त उच्च-स्तरीय किंवा अत्यंत आवश्यक भूमिका असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीच भरले जाईल.

यामुळे, इतर विदेशी कर्मचाऱ्यांच्या नोकरीत कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी त्यांना २१ सप्टेंबरपर्यंत अमेरिकेत परतणे अनिवार्य आहे. कंपनीने अमेरिकेत असलेल्या H-1B व्हिसाधारकांनाही त्यांच्या प्रवासाचे सर्व बेत रद्द करून अमेरिकेतच राहण्याचा सल्ला दिला आहे. जरी H-4 व्हिसाधारकांचा थेट उल्लेख नसला तरी, त्यांच्या जोडीदार आणि मुलांनाही आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्यास सांगितले आहे.

भारतीय कर्मचाऱ्यांवर मोठा परिणाम
H-1B व्हिसाधारकांपैकी ७० टक्क्यांहून अधिक भारतीय नागरिक असल्याने, या नव्या नियमाचा भारताच्या आयटी क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्टने भारत दौऱ्यावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना शक्य तितक्या लवकर परत येण्यास सांगितले आहे. कंपनीने मान्य केले आहे की कमी वेळेत परत येणे सर्वांसाठी सोयीचे नाही, परंतु नियम लागू होण्यापूर्वी अमेरिकेत परत येणे हाच सर्वात सुरक्षित पर्याय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Trump's decision has increased the fear of Indians in America; Microsoft sends urgent email to employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.