इराण-अमेरिका वादात ट्रम्प यांचा भारताला ओढण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 06:26 AM2020-01-05T06:26:16+5:302020-01-05T06:26:40+5:30

सुलेमानी यांच्या ड्रोन हल्ल्याद्वारे हत्येचे जोरदार समर्थन करीत, अमेरिकेने आखातातील हितसंबंध जपण्यासाठी ३,२०० सैनिकांची नवी कुमक तिकडे रवाना केली आहे.

Trump's attempt to pull India over Iran-US dispute | इराण-अमेरिका वादात ट्रम्प यांचा भारताला ओढण्याचा प्रयत्न

इराण-अमेरिका वादात ट्रम्प यांचा भारताला ओढण्याचा प्रयत्न

Next

वॉशिंग्टन/बगदाद : इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड सैन्यदलातील ‘कुद््स फोर्स’ या विशेष विभागाचे कमांडर जनरल कासेम सुलेमानी यांच्या ड्रोन हल्ल्याद्वारे हत्येचे जोरदार समर्थन करीत, अमेरिकेने आखातातील हितसंबंध जपण्यासाठी ३,२०० सैनिकांची नवी कुमक तिकडे रवाना केली आहे. नवी दिल्ली तसेच लंडन शहरात दहशतवादी हल्ल्याचे कट रचण्यात कासेम सुलेमानी याचा सहभाग होता, असा आरोप करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-अमेरिका वादात भारताला ओढण्याचा प्रयत्न केला आहे.
जनरल सुलेमानी व इराकच्या निमलष्करी दलांचे उपप्रमुख अबु महदी अल मुहंदिस यांच्यासह हल्ल्यात ठार झालेल्या शहिदांच्या बगदादमध्ये निघालेल्या अंत्ययात्रेत सूडाच्या घोषणा देत हजारो इराकी नागरिक सामील झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुलेमानी यांच्या हत्येचे जोरदार समर्थन केले. युद्ध सुरू करण्यासाठी नव्हे, तर ते भडकू नये यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगून ट्रम्प म्हणाले की, सुलेमानी व त्यांच्या दहशतवादी पथकांनी अमेरिकेच्याच नव्हे, तर इतर अनेक देशांच्या हजारो निष्पाप नागरिकांचे प्राण घेतले होते.
अमेरिका व इराण यांच्यातील संबंध ताणले असताना आणि हे दोन्ही देश युद्धाच्या तोंडाशी उभे असताना अमेरिकेने इराकमध्ये इराण समर्थक ताफ्यावर शनिवारी पुन्हा हल्ला केला. हशद अल शाबी या सशस्त्र दलाच्या वैद्यकीय ताफ्यावर अमेरिकेने हा हल्ला केल्याचे वृत्त इराकच्या सरकारी टीव्हीने दिले. मात्र नंतर अमेरिकेने व हशद अल शाबीनेही याचा इन्कार केला.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री माइक पॉम्पेओ यांनी अनेक मित्रदेशांच्या नेत्यांना फोन करून सुलेमानी यांची हत्या व त्यामुळे उद्भवू शकणाऱ्या संभाव्य परिस्थितीची माहिती दिली. पाकिस्तानमध्ये त्यांनी पंतप्रधान इम्रान खान वा संरक्षणमंत्र्यांऐवजी लष्करप्रमुख जनरल आसिफ बाजवा यांना फोन केला. यावरून राजकीय नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त केली. 
>सुलेमानी यांच्या मृत्यूनिमित्त इराणने तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला. बगदाद येथील विराट अंत्ययात्रेनंतर ड्रोन हल्ल्यात मारल्या गेलेल्या मुहंदिस यांच्यासह इराकच्या मृतांवर उत्तरेकडील नज्फ या पवित्र शहरात अंत्यविधी करण्यात आले. सुलेमानी व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांचे मृतदेह अंत्यविधीसाठी इराणला पाठविण्यात आले.

Web Title: Trump's attempt to pull India over Iran-US dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.