अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 08:44 IST2025-10-18T08:43:57+5:302025-10-18T08:44:49+5:30
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांनी शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली.

अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांनी शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गाझा शांतता करार घडवून आणल्याबद्दल ट्रम्प यांचे अभिनंदन केले आणि युक्रेन युद्ध संपवण्यासंदर्भातही चर्चा केली. जेलेंस्की म्हणाले की, हे पाऊल युक्रेन युद्ध संपवण्यासाठी एक महत्त्वाचे 'मोमेंटम' बनू शकते.
या भेटीदरम्यान जेलेंस्की म्हणाले, "मिडल ईस्टमध्ये यशस्वी युद्धविराम केल्याबद्दल आपले अभिनंदन. मला वाटते की हे पाऊल युक्रेन आणि रशियाचे युद्ध थांबवण्याची एक महत्त्वाची संधी आहे." त्यांनी चर्चेसाठी द्विपक्षीय किंवा त्रिपक्षीय अशा कोणत्याही स्वरूपात तयार असल्याचे सांगितले आणि "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि माझ्यासाठी सुरक्षा हमी अत्यंत महत्त्वाच्या आहेत," असे स्पष्ट केले. यावेळी अमेरिकेच्या ताकदीचेही त्यांनी कौतुक केले.
नाटोबद्दल काय म्हणाले?
युद्ध समाप्त करण्यासाठी युक्रेन नाटोमध्ये सामील होण्याचा विचार सोडून देईल का, असे विचारले असता जेलेंस्की म्हणाले की, नाटो सदस्यत्व हा युक्रेनी लोकांसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याचा निर्णय युक्रेन आणि त्याच्या सहयोगी देशांवर अवलंबून आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हल्ले सहन करणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी सुरक्षेची हमी सर्वात आवश्यक आहे.
जेलेंस्कींची अट काय?
जेलेंस्की यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून द्विपक्षीय सुरक्षा हमीची मागणी केली. तसेच, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन सध्या शांततेसाठी तयार नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, ट्रम्प यांना उद्देशून ते म्हणाले, "मला खात्री आहे की तुमच्या मदतीने आम्ही हे युद्ध थांबवू शकतो." पुढे ते म्हणाले, "आम्हाला एकत्र बसून चर्चा करावी लागेल. आम्हाला युद्धविराम हवा आहे — पुतिन यांना तो नको आहे."
ट्रम्प यांनी केला 'टॉमहॉक' मिसाईलचा उल्लेख
यावेळी ट्रम्प यांनी 'टॉमहॉक' क्रूझ मिसाईलचाही उल्लेख केला. युक्रेनला रशियाच्या आत खोलवर हल्ला करण्याची क्षमता मिळू शकेल अशा नवीन लष्करी क्षमतांवर ते आणि जेलेंस्की सविस्तर चर्चा करणार असल्याची त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पत्रकारांनी या नवीन क्षमतांवर चर्चा होईल का, असे विचारले असता ट्रम्प यांनी "आम्ही यावर नक्कीच बोलणार आहोत. हा निश्चितपणे एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो चर्चेचा भाग असेल," असे उत्तर दिले.
ट्रम्प यांनी जेलेंस्कींची प्रशंसा करत म्हटले की, त्यांनी युक्रेन युद्धाच्या संपूर्ण काळात खूप काही सहन केले असून मोठी मजबुती दाखवली आहे. युक्रेनने कठीण परिस्थितीतही हार मानली नाही आणि जेलेंस्की यांनी एक धाडसी नेता म्हणून काम केले आहे, यावर त्यांनी जोर दिला. ट्रम्प यांचे हे विधान अमेरिका आणि युक्रेनच्या संबंधांसाठी महत्त्वाचे मानले जात असून, रशियावर दबाव वाढवण्याची संभाव्य रणनीती म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.