जगातील प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या मतभेदानंतर, अमेरिकन जनतेला दिलेला शब्द पाळला आहे. आपला शब्द पाळत त्यांनी शनिवारी (05 जुलै, 2025) 'अमेरिका पार्टी' नावाच्या एका नव्या राजीय पक्षाची घोषणा केली. महत्वाचे म्हणजे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठ्या खर्चाशी संबंधित 'वन बिग ब्युटीफुल' विधेयकाला काँग्रेसने मंजुरी दिल्यानंतर, मस्क यांनी ही घोषणा केली आहे.
काही काळ, मस्क हे ट्रम्प यांचे समर्थक होते. त्यांनी ट्रम्प यांच्या २०२४ च्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर खर्चही केला होता. एवढेच नाही तर, सरकारचा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी ट्रम्प यांच्या सोबत कामही केले होते. मात्र आता दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. खरे तर, ट्रम्प यांच्या नव्या 'वन बिग ब्युटीफुल' विधेयकाला मस्क यांनी विरोध केला होता. या विधेयकामुळे अमेरिकेवरील कर्ज मोठ्या प्रमाणावर वाढेल, असे मस्क यांचे म्हणणे आहे.
राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात काय म्हणाले मस्क?आपण 2026 च्या मध्यावधी निवडणुका अथवा 2028 ची राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाग घेणार का? असा प्रश्न एका सोशल मीडिया युजरने मस्क यांना विचारला होता. यावर मस्क यांनी उत्तर दिले पुढील वर्षी (Next Year).
यापूर्वी केले होते सर्वेक्षण -अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनी अर्थात ४ जुलैला मस्क यांनी एक्सवर एक सर्वेक्षण पोस्ट केली होती. यात, "आपण द्विपक्षीय प्रणालीपासून स्वतंत्र व्हावे का? आणि आपल्याला नवा पक्ष हवा आहे का?" असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला होता. या सर्वेक्षणात ६५.४% लोकांनी "हो" असे उत्तर दिले होते, तर ३४.६% लोकांनी "नाही" असे उत्तर दिले होते.