पुतीन येऊन जाताच अमेरिकेने भारतावर राग काढला; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:11 IST2025-12-10T10:10:58+5:302025-12-10T10:11:32+5:30
Trump US Visa Policy: रद्द करण्यात आलेल्या या व्हिसांमध्ये ८,००० हून अधिक व्हिसा हे विद्यार्थ्यांचे आहेत, हे विशेष उल्लेखनीय आहे.

पुतीन येऊन जाताच अमेरिकेने भारतावर राग काढला; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात येऊन जाताच अमेरिकेने मोठी कुरघोडी केली आहे. भारतीयांच्या H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या असून जगभरातून ८५ हजार हून अधिक व्हिसा रद्द केले आहेत. यामध्ये भारतीयांचीच मोठी संख्या आहे.
अमेरिकेतील अवैध स्थलांतराचा मुद्दा ट्रम्प प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे अमेरिकेला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी कठोर स्थलांतरण नियम लागू करण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर ही माहिती दिली आहे. ही कारवाई प्रशासनाच्या "देशात ये-जा करणाऱ्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवणे" या व्यापक धोरणाचा भाग आहे.
काही मीडिया रिपोर्टनुसार अमेरिकेने डिसेंबरच्या मध्यानंतर ते मार्च २०२६ पर्यंत होणारे एच-१बी व्हिसासाठीच्या मुलाखती स्थगित केल्या आहेत. अद्याप याचा आकडा समोर आलेला नाही. ही भारतीयांविरोधातील कारवाई मानली जात आहे.
विद्यार्थ्यांचे व्हिसाही रडारवर
रद्द करण्यात आलेल्या या व्हिसांमध्ये ८,००० हून अधिक व्हिसा हे विद्यार्थ्यांचे आहेत, हे विशेष उल्लेखनीय आहे. दारू पिऊन गाडी चालवणे, चोरी आणि हल्ला यांसारख्या गुन्ह्यांमुळे मागील एका वर्षात जवळपास अर्धे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. उर्वरित व्हिसा नेमक्या कोणत्या कारणांमुळे रद्द केले गेले, याबाबत अद्याप तपशील देण्यात आलेला नाही. ट्रम्प प्रशासनाच्या या कठोर धोरणामुळे जगभरातून अमेरिकेत शिक्षण आणि नोकरीसाठी येणाऱ्या व्यक्तींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.