शिकागो : भारत आणि चीनसारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांना दिली जाणारी सबसिडी रोखणे गरजेचे आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. काही देश स्वत: ला विकसनशील देशांच्या श्रेणीत ठेवून सबसिडीचे लाभ घेतात. हे आता बंद केले पाहिजे, असे सांगतानाच, अमेरिकासुद्धा विकसनशील देश असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.उत्तर भागातील डकोटा प्रांताच्या फर्गो येथे एका कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले की, अमेरिका एक विकसनशील देश आहे. त्यामुळे आपल्या देशानेही अन्य देशांच्या तुलनेत वेगाने प्रगती करावी, असे मला वाटते. त्यांनी जागतिक व्यापार संघटनेवर (डब्ल्यूटीओ) टीका केली. त्यांना असे वाटते की, बहुपक्षीय व्यापार संघटनेने चीनला सदस्य करून, त्यांना जगातील एक मोठी आर्थिक शक्ती होण्याची संधी दिली आहे.ट्रम्प म्हणाले की, आम्ही अशा काही देशांना यासाठी सबसिडी देतो कारण हे देश पर्याप्त स्वरूपात अद्याप विकसित झाले नाहीत. पण, भारत, चीन यासारखे देश तर प्रगती करत आहेत. काही देश स्वत:ला विकसनशील म्हणतात. या श्रेणीत राहून सबसिडी मिळवितात.आम्हाला त्यांना निधी द्यावा लागतो. हा सर्व वेडेपणा आहे. आम्ही हे बंद करणार आहोत. आम्हीसुद्धा विकसनशील आहोत. मला वाटते आम्हालाही त्या वर्गात ठेवावे. आम्हीसुद्धा अन्य देशांप्रमाणे वेगाने वाढू इच्छितो. (वृत्तसंस्था)
ट्रम्प म्हणतात... आम्हीसुद्धा विकसनशीलच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 04:15 IST