माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 08:30 IST2025-09-26T08:28:04+5:302025-09-26T08:30:42+5:30
ट्रम्प व्यासपीठावर चढताच टेलिप्रॉप्टर बंद पडला. १५ मिनिटांनंतर तो चालू झाला; परंतु त्यांनी टेलिप्रॉप्टरचा वापर न करताच ५७ मिनिटे भाषण केले.

माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात त्यांना आलेल्या वाईट अनुभवानंतर ‘या भयंकर’ घटनांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संयुक्त राष्ट्र संघानेही याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘सिक्रेट सर्व्हिस’ला या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
कोणत्या घटनांमुळे ट्रम्प संतापले?
संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे भाषण होणार होते. त्यासाठी ते फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यासह पोहोचले. सभागृहात जाण्यासाठी एस्केलेटवर चढले खरे; परंतु या स्वयंचलित पायऱ्या अचानक थांबल्या व दोघांनाही पायीच जावे लागले. ट्रम्प म्हणाले की, ‘संयुक्त राष्ट्र संघाला स्वत:ची लाज वाटली पाहिजे. एस्केलेटर क्षणार्धात बंद पडले. थोडक्यात निभावले, नाही तरी मेलानिया आणि मी तोंडावर आपटलो असतो. ट्रम्प व्यासपीठावर चढताच टेलिप्रॉप्टर बंद पडला. १५ मिनिटांनंतर तो चालू झाला; परंतु त्यांनी टेलिप्रॉप्टरचा वापर न करताच ५७ मिनिटे भाषण केले. ट्रम्प म्हणाले की, ‘माझ्या भाषणावर चांगल्या प्रतिक्रिया आल्या. यावेळी मी जी संदर्भाची जुळणी केली तशी फार कमी लोक करू शकतात’.
स्पीकरच खराब होते
भाषणाचा आवाजच नेत्यांपर्यंत पोहोचू शकला नाही. कारण, स्पीकर व्यवस्थित कार्यरत नव्हते, असा ट्रम्प यांचा तिसरा आरोप आहे. ट्रम्प म्हणतात, ‘मी मेलानियाला विचारले, माझे भाषण ऐकलेस? ती म्हणाली तुम्ही काय बोललात ते मी ऐकूच शकले नाही.’ यावरून कटाचा संदर्भ ट्रम्प यांनी दिला.