CoronaVirus News: ना टोचणार, ना दुखणार! नवी लस कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर भारी पडणार; चाचणीला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 12:43 IST2021-12-15T12:38:39+5:302021-12-15T12:43:10+5:30
CoronaVirus News: भविष्यात येणाऱ्या कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर प्रभावी ठरणाऱ्या लसीवर काम सुरू

CoronaVirus News: ना टोचणार, ना दुखणार! नवी लस कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर भारी पडणार; चाचणीला सुरुवात
मुंबई: जगातील ६० पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ ब्रिटनमधील परिस्थिती बिघडू लागली आहे. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे ६१ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनादेखील ओमायक्रॉनची लागण होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. लस निष्प्रभ ठरू लागल्यानं सगळ्यांचीच चिंता वाढली असताना आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
भविष्यात येणाऱ्या कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटविरोधातील लसीची चाचणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ही लस नीडल फ्री असेल. म्हणजेच ही लस देताना सुईचा वापर केला जाणार नाही. केंब्रिज विद्यापीठाचे प्राध्यापक आणि डिओसिनवॅक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोनाथन हिनेय यांनी या लसीची निर्मिती केली आहे. एनआयएचआर साऊदम्पटन क्लिनिकल रिसर्चमध्ये लसीच्या चाचण्या होतील. त्यात १८ ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्तींचा सहभाग असेल.
कोरोनाचे नवे व्हेरिएंट येत असताना आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होत असताना आपण नव्या तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा, असं जोनाथन हिनेय यांनी सांगितलं. डिओज-कोवॅक्स लसीमध्ये वेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना व्हेरिएंट्स आणि इतर कोरोना विषाणूंविरोधात अधिक सक्षम सुरक्षा मिळते, असा दावा त्यांनी केला.
आपण नव्या तंत्रज्ञानावर आधारित लसी तयार करायला हव्यात. त्यांच्या चाचणीसाठी उमेदवार तयार ठेवायला हवेत. त्यामुळ पुढील विषाणूंच्या धोक्यापासून आपला बचाव होईल, असं जोनाथन यांनी सांगितलं. 'जागतिक कोरोना लसीच्या दिशेन आपण पहिलं पाऊल टाकत आहोत. ही लस केवळ कोरोना व्हेरिएंट्सपासूनच आपलं रक्षण करणार नाही, तर भविष्यातील कोरोना विषाणूंपासूनही आपला बचाव करेल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.