व्यापार युद्ध शिगेला; चीनचे अमेरिकेवर १२५ टक्के टॅरिफ, शुल्कवाढ आजपासूनच लागू : शी जिनपिंग म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 07:08 IST2025-04-12T07:07:57+5:302025-04-12T07:08:43+5:30

US-China Trade war: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने चीनविरोधातील समतुल्य आयात शुल्क (रिसिप्रोकल टॅरिफ) १४५ टक्के केल्यानंतर चीनने पुन्हा एकदा प्रत्युत्तर देऊन अमेरिकेवरील आयात शुल्क वाढवून १२५ टक्के केले आहे. चीनच्या सीमा शुल्क आयोगाने या शुल्काची घोषणा शुक्रवारी केली.

Trade war at its peak; China's 125 percent tariff on America, tariff hike effective from today: Xi Jinping said... | व्यापार युद्ध शिगेला; चीनचे अमेरिकेवर १२५ टक्के टॅरिफ, शुल्कवाढ आजपासूनच लागू : शी जिनपिंग म्हणाले...

व्यापार युद्ध शिगेला; चीनचे अमेरिकेवर १२५ टक्के टॅरिफ, शुल्कवाढ आजपासूनच लागू : शी जिनपिंग म्हणाले...

बीजिंग - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने चीनविरोधातील समतुल्य आयात शुल्क (रिसिप्रोकल टॅरिफ) १४५ टक्के केल्यानंतर चीनने पुन्हा एकदा प्रत्युत्तर देऊन अमेरिकेवरील आयात शुल्क वाढवून १२५ टक्के केले आहे. चीनच्या सीमा शुल्क आयोगाने या शुल्काची घोषणा शुक्रवारी केली.

अमेरिकेने चीनवर ३४ टक्के आयात शुल्क लावल्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही देशांतील कर युद्धाला सुरुवात झाली. चीनने जशास तसे उत्तर देत अमेरिकी मालावर ३४ टक्के शुल्क लावले होते. त्यानंतर दोन्ही देशांनी शुल्क वाढवत वाढवत अनुक्रमे १४५ टक्के व १२५ टक्क्यांवर नेले. चीनचे वाढीव शुल्क शनिवारपासून लागू होणार आहे. 

चिनी सीमा शुल्क आयोगाने म्हटले की, अमेरिकेने आणखी शुल्कवाढ केली, तरी त्याला काहीही अर्थ राहणार नाही. जगाच्या आर्थिक इतिहासात तो एक विनोद बनून राहील. चीनने लावलेल्या शुल्कावर अमेरिकी आयात अशक्य आहे. यापुढे अमेरिकेने शुल्कवाढ  केली, तरी चीन त्याकडे दुर्लक्ष करील. मात्र आम्ही याविरुद्ध शेवटपर्यंत लढत राहू.

इतर देशांवरील आयात शुल्काला अमेरिकेने ९० दिवसांची स्थगिती दिल्यानंतर या व्यापारी युद्धात चीन एकटा पडल्याचे चित्र आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने अमेरिकेविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यूटीओ) खटला दाखल केला आहे. (वृत्तसंस्था)

अमेरिकेच्या दादागिरीविरोधात लढू; जिनपिंग यांचे युरोपीय संघास आवाहन
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेच्या दादागिरीविरुद्ध लढण्यासाठी युरोपीय संघास सहकार्याचे आवाहन केले. चीनच्या दौऱ्यावर आलेले स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सॅंचेझ यांच्याशी जिनपिंग यांनी शुक्रवारी चर्चा केली. 

या भेटीनंतर जिनपिंग यांनी म्हटले, ‘कर युद्धात कोणीही विजेता ठरत नसतो. जगाच्या विरोधात जाण्याची परिणती स्वत:च एकाकी पडण्यात होते. अमेरिकेच्या दादागिरीचा आपण संयुक्तरीत्या मुकाबला करू या.’  सँचेझ यांनी सांगितले की, युरोपीय संघ आणि चीन यांच्यात अधिक संतुलित संबंध असावेत, अशी स्पेनची भूमिका आहे. व्यापारी युद्ध चांगले नाही.

सेन्सेक्स, निफ्टी २ टक्क्यांनी वाढले
शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी यांनी सुमारे २ टक्क्यांची उसळी घेतली. सेन्सेक्स १,३१०.११ अंकांनी वाढून ७५,१५७.२६ अंकांवर बंद झाला. निफ्टी ४२९.४० अंकांनी वाढून २२,८२८.५५ अंकांवर बंद झाला. 

टॅरिफमुळे श्रीलंकेसमोर अस्थिरता : नाणेनिधी
कोलंबो : अमेरिकेने जगभरातील बहुतांश देशांवर आयात शुल्क लादल्यानंतर निर्माण झालेल्या जागतिक स्थितीमुळे श्रीलंकेसमोर पुन्हा एकदा अस्थिरतेचे आव्हान उभे ठाकले आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने शुक्रवारी दिला. 

आपल्या आर्थिक संकटातून श्रीलंका अजून देखील पूर्णपणे  सावरलेली नाही, त्यातच हा धक्का बसला आहे, असे नाणेनिधीने म्हटले. २०२३ मध्ये श्रीलंकेला दिलेल्या २.९ अब्ज डॉलरच्या अर्थसाह्याच्या यशाचा आढावा घेण्यासाठी नाणेनिधीचे एक पथक सध्या श्रीलंकेत आले आहे. 

Web Title: Trade war at its peak; China's 125 percent tariff on America, tariff hike effective from today: Xi Jinping said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.