"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:11 IST2025-10-29T12:10:45+5:302025-10-29T12:11:38+5:30
एका महिन्यात टोमॅटोच्या किमतीत ४०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. टोमॅटोची किंमत ६०० रुपये प्रति किलोने पोहोचल्याने फक्त एक टोमॅटो ७५ रुपयांना मिळत आहे.

"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. महागाईही शिगेला पोहोचली आहे. भाज्यांपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्व गोष्टींसाठी लोकांना जास्त किंमत मोजावी लागत आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. टोमॅटो तब्बल ६०० रुपये प्रति किलोने विकले जात आहेत.
एका महिन्यात टोमॅटोच्या किमतीत ४०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. टोमॅटोची किंमत ६०० रुपये प्रति किलोने पोहोचल्याने फक्त एक टोमॅटो ७५ रुपयांना मिळत आहे. पाकिस्तानमध्ये टोमॅटोच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे जनतेमध्ये रोष वाढला आहे, ज्यामुळे रस्त्यांपासून संसदेपर्यंत निदर्शनं सुरू झाली आहेत.
"टोमॅटोसाठी आता घ्यावं लागेल कर्ज"
पाकिस्तानी संसदेत झालेल्या गोंधळादरम्यान, काही खासदारांनी टोमॅटोसाठी आता कर्जाची मागणी केली आहे. काही खासदारांनी पाकिस्तानमधील ते दिवस सांगितले जेव्हा टोमॅटो स्वस्त दरात उपलब्ध होते. टोमॅटोच्या किमतीबद्दल तक्रार करणाऱ्या पाकिस्तानी खासदाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये खासदार म्हणतात की, टोमॅटो इथे आणणे खूप कठीण आहे. आमचे सहकारी फारुख साहेब यांनी याची व्यवस्था केल्याबद्दल धन्यवाद. या टोमॅटोची किंमत ७५ रुपये आहे.

पाकिस्तानात का वाढत आहेत टोमॅटोचे दर?
पाकिस्तान-अफगाणिस्तान बॉर्डर बंद होणं हे पाकिस्तानमधील महागाईचं एक प्रमुख कारण आहे. ११ ऑक्टोबरपासून संघर्ष आणि हवाई हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील व्यापार पूर्णपणे थांबला आहे. इस्तंबूलमध्ये अलिकडेच झालेल्या शांतता चर्चा देखील अयशस्वी झाल्या, २,६०० किलोमीटर लांबीची सीमा अजूनही सीलबंद आहे, त्यामुळे व्यापार थांबला आहे.
असा अंदाज आहे की, ही सीमा बंद केल्याने दरवर्षी जवळपास १० लाख डॉलर्सचं नुकसान होत आहे. आधी भारताकडून आयात थांबल्यामुळे पाकिस्तान टोमॅटोसाठी अफगाणिस्तानवर अवलंबून होता, परंतु आता हा पुरवठाही विस्कळीत झाला आहे. यामुळे टोमॅटोच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, संपूर्ण पाकिस्तानमध्ये भाज्यांचे दर विक्रमी पातळीवर आहेत. लसूण ४०० रुपये प्रति किलो, आले ७५० रुपये प्रति किलो, वाटाणे ५०० रुपये प्रति किलो आणि कांदे १२० रुपये प्रति किलो दराने मिळतात.