आज सकाळी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. सुमारे ६.८ तीव्रतेच्या या भूकंपामुळे तिबेटमध्ये आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८ जण जखमी झाले आहेत. चिनी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं केंद्र २८.५ डिग्री उत्तर अक्षांश आणि ८७.४५ डिग्री पूर्व येथे होता. या भूकंपाचं केंद्र १० किमी खोलीवर होतं. दरम्यान, या भूकंपाचे झटके नेपाळ, भारत आणि बांगलादेश पर्यंत जाणवले.
आतापर्यंत या भूकंपात ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र काही वृत्तसंस्थांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. भूकंपामुळे तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी लोक घरांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
दरम्यान, नेपाळसह उत्तर भारतातील अनेक राज्यांतही आज सकाळी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले होते. नेपाळमध्ये या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ७.१ एवढी मोजण्यात आली. तर तिबेटमध्ये या भूकंपाची तीव्रता ६.८ एवढी मोजण्यात आली. भारतात बिहारमधील मोतिहारी आणि समस्तीपूरसह अनेक भागात सकाळी ६.४० वाजता अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. जवळपाच पाच सेकंदांपर्यंत भूकंपाचे हे झटके जाणवले. नेपाळमध्ये या भूकंपाची ही तीव्रता ७.१ एवढी मोजण्यात आली.