कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाच्या दहशतवाद्यांनी तीन भारतीय नागरिकांचं अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना पश्चिम आफ्रिकेतील माली या देशात घडली आहे. भारत सरकारने या घटनेबाबत चिंता व्यक्त केली असून, या भारतीय नागरिकांची सुरक्षित आणि सुखरूप सुटका व्हावी यासाठी सर्व ती आवश्यक पावलं उचलण्याचं आवाहन माली सरकारला केलं आहे.
याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या अधिक माहितीनुसार १ जुलै रोजी मालीमधील कायेस येथील डायमंड सिमेंट कारखान्यामध्ये काही सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केला. तसेच तिथे काम करत असलेल्या तीन भारतीयांचं अपहरण केलं. या अपहरणाची जबाबदारी अल कायदाशी संबंधित जमात नुसरत अल इस्लाम वल मुस्लिमीन या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. तसेच त्यांनी मालीमध्ये झालेल्या इतर काही दहशतवादी हल्ल्यांचीही जबाबदारी स्वीकारली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, मालीची राजधानी असलेल्या बमाको येथील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासन, तपास यंत्रणा आणि सिमेंट कारखाना व्यवस्थापनाशी सातत्याने संपर्क ठेवून आहे. तसेच अपहरण करण्यात आलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांशीही सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असून, त्यांनाही प्रत्येक घडामोडीची माहिती दिली जात आहे.
भारत सरकारने या घटनेचा उल्लेख हिंसक आणि अत्यंत निंदनीय कृत्य असा केला आहे. तसेच माली सरकारने या भारतीयांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी मदत करावी, असं आवाहन केलं आहे. तर परराष्ट्र मंत्रालयाने आम्ही भारतीयांना सर्वतोपरी मदत पुरवू, तसेच अपहृत भारतीय नागरिकांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगितले. याबरोबरच भारत सरकारने मालीमध्ये राहणाऱ्या इतर भारतीयांना सावधगिरी बाळगण्याचे आणि नियमितपणे दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे.