"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 22:46 IST2026-04-13T22:43:51+5:302026-04-13T22:46:56+5:30
US blockade Iranian ports: अमेरिकेच्या नौदलाने इराणच्या बंदरांची नाकेबंदी सुरू केली आहे. नाकेबंदी करताना इराणकडून हल्ले करण्याची शक्यता असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली आहे.

"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
अमेरिकन सेंट्रल कमांडने घोषणा केल्याप्रमाणे सोमवारी सकाळी १० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.३० वाजता) इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळील बंदरांची नाकेबंदी करण्यास सुरूवात केली आहे. अमेरिकेच्या लष्कराकडून होर्मुझ सामुद्रधुनीत हालचाली वाढलेल्या असतानाच इराणकडून हल्ले होण्याची शक्यता आहे. त्यातच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नष्ट करण्याचा इशारा दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल ट्रूथ मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "इराणचे नौदल समुद्राच्या तळाशी पडले आहे, पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, १५८ जहाजे. आम्ही त्यांच्या ज्या काही थोड्या 'फास्ट अटॅक शिप्स' (जलद हल्ला करणारी जहाजे) आहेत त्यांना अद्याप लक्ष्य केलेले नाही, कारण आम्ही त्यांना फार मोठा धोका मानले नव्हते."
तस्करांविरुद्ध वापरली जाणारी यंत्रणा वापरू
पुढे बोलताना ट्रम्प यांनी इशारा देताना म्हटले आहे की, "जर यापैकी कोणतेही जहाज आमच्या नाकेबंदीच्या जवळ आले, तर त्यांना तात्काळ संपवून टाकले जाईल. यासाठी आम्ही त्याच यंत्रणेचा वापर करू जी आम्ही समुद्रातील अंमली पदार्थांच्या तस्करांविरुद्ध वापरतो. हे काम अत्यंत वेगवान आणि क्रूर असेल", असे ट्रम्प इराणला म्हणाले आहेत.
US President Donald Trump posts on his Truth Social, "...If any of these ships come anywhere close to our blockade, they will be immediately eliminated, using the same system of kill that we use against the drug dealers on boats at Sea..." pic.twitter.com/ogGen3VcRI
— ANI (@ANI) April 13, 2026
फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या नौदलाने इराणच्या बंदरांची नाकेबंदी करण्यास सुरूवात केली आहे. अमेरिका सेंट्रल कमांडने घोषणा केली असून, त्यानुसार इराणच्या बंदरात येणारी आणि जाणारी दोन्ही प्रकारची जहाजे रोखण्यात येणार आहे.
इराणच्या बंदराचा किंवा किनारपट्टीचा वापर करणाऱ्या जहाजांना लक्ष्य केले जाईल. यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, असे सेंटकॉम अर्थात अमेरिकन सेंट्रल कमांडने म्हटले आहे.