कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 10:44 IST2025-10-28T10:41:42+5:302025-10-28T10:44:23+5:30
जगभरात प्रीमियम कॉफीसाठी प्रसिद्ध असलेला कॅरेबियन देश कॅरेबियन देश जमैका सध्या मोठ्या संकटाला सामोरा जात आहे.

कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
जगभरात प्रीमियम कॉफीसाठी प्रसिद्ध असलेला कॅरेबियन देश कॅरेबियन देश जमैका सध्या मोठ्या संकटाला सामोरा जात आहे. २०२५ या वर्षातील सगळ्यात मोठे आणि महाभयंकर असे चक्रीवादळ या देशाच्या दिशेने सरकले आहे. 'मेलिसा' नावाचे चक्रीवादळ हे ५व्या स्तरातील म्हणजेच विनाशकारी असून, आतापर्यंत या वादळाने तीन लोकांचा जीव घेतला आहे. इतकंच नाही तर, देशांतील अनेक भागात या वादळाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. हैती आणि डॉमिनिकन रिपब्लिक या भागात ४ लोकांनी आपला जीव गमावला.
या देशांतील हजारो घरातील वीज गायब झाली आहे. झाडं उन्मळून पडली आहेत. अमेरिकेच्या हवामान विभागाने या वादळाला विनाशकारी आणि जीवघेणे म्हटले आहे.
वेगाने वाढतोय कहर
मेलिसा वादळ सध्या किंग्स्टनच्या नैऋत्येस सुमारे १५० मैलांवर पुढे सरकत आहे. त्याचे वारे १७५ मैल प्रतितास (सुमारे २८२ किमी /तास) वेगाने वाहत आहेत, ज्यामुळे ते या वर्षी पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ बनले आहे. हवामान खात्याच्या मते , मंगळवारी सकाळपर्यंत ते तीव्र होण्याची शक्यता आहे.
सॅटेलाइटमधून घतेलेल्या फोटोंमध्ये वादळ एका परिपूर्ण बझ-सॉ रचनेत दिसत आहे, मध्यभागी एक डोळा आहे आणि त्याच्याभोवती ढग फिरत आहेत . तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मेलिसाची शक्ती काही तासांतच अनेक पटींनी वाढली.
मुसळधार पाऊस आणि पुराचा धोका
मेलिसामुळे देशात सतत मुसळधार पाऊस, १३ फूट उंचीच्या लाटा आणि भूस्खलन होण्याची शक्यता आहे . काही भागात ४० इंचांपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जमैकाच्या आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ८००हून अधिक निवारे तयार करण्यात आले आहेत, ज्यामध्ये सध्या अंदाजे ९७० लोक राहत आहेत. सरकारने किनारी भागात अनिवार्य स्थलांतराचे आदेश जारी केले आहेत .
हवामान बदलामुळे चक्रीवादळाची ताकद वाढणार?
हवामानशास्त्रज्ञांच्या मते, कॅरिबियन समुद्रातील असामान्यपणे उष्ण तापमान हे वादळाच्या तीव्रतेचे एक प्रमुख कारण आहे. क्लायमेट सेंट्रल या संशोधन गटाच्या मते , या प्रदेशातील समुद्राचे तापमान इतके जास्त आहे की, अशा घटना घडण्याची शक्यता ५०० ते ८०० पट वाढली आहे. उबदार पाणी आणि आर्द्रतेमुळे मेलिसाला आणखी बळ मिळाले आहे, ज्यामुळे या वादळाच वेग आणि ताकद दोन्ही विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.
प्रीमियम कॉफीसाठी प्रसिद्ध देश
जमैकन कॉफी ही जगातील सर्वोत्तम कॉफीपैकी एक मानली जाते . कॅरेबियन आणि दक्षिण अमेरिकेतील इतर देशांपेक्षा ती खूपच कमी प्रमाणात उत्पादित केली जाते. या सुंदर देशातील शेतकरी, विशेषतः ब्लू माउंटन प्रदेशातील शेतकरी , त्यांच्या उत्कृष्ट कॉफी बीन्ससाठी खूप मेहनत घेतात. जगातील सर्वात महागडी कॉफी 'ब्लू माउंटन' देखील येथे उत्पादित केली जाते .