पाकिस्तानमध्ये सध्या एका ३० वर्षांच्या महिलेने थेट लष्कराला उघड आव्हान देऊन खळबळ उडवून दिली आहे. मानवाधिकार वकील ईमान मजारी आणि त्यांचे पती हादी अली चट्ठा यांनी लष्कराच्या नाकी नऊ आणले आहे. लष्करावर अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली खटला सुरू असतानाच, ईमान यांनी आता थेट लष्कराचे मीडिया प्रमुख म्हणजेच डीजी आयएसपीआर यांनाच साक्षीदार म्हणून न्यायालयात बोलावण्याची मागणी केल्याने पाकिस्तानच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
काय आहे हे प्रकरण?
ईमान मजारी आणि त्यांचे पती हादी अली चट्ठा यांच्यावर लष्कराच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आणि द्वेष पसरवल्याचा आरोप आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांना याप्रकरणी अटकही करण्यात आली होती. सध्या हा खटला सुरू असताना, ६ जानेवारी रोजी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी एका पत्रकार परिषदेत ईमान मजारी यांना 'देशद्रोही' आणि 'विदेशी एजंट' म्हटले होते. याचाच आधार घेत ईमान यांनी आता चक्क लष्करी प्रवक्त्यालाच कोर्टात खेचण्याची तयारी सुरू केली आहे.
कोर्टात मोठी मागणी
ईमान यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून मागणी केली आहे की, "जेव्हा खटला न्यायप्रविष्ट आहे, तेव्हा लष्करी प्रवक्त्याने मला 'देशद्रोही' म्हणणे चुकीचे आहे. त्यामुळे सत्य बाहेर येण्यासाठी डीजी आयएसपीआर यांना साक्षीदार म्हणून न्यायालयात बोलवावे." न्यायालयाने या अर्जाची प्रत सरकारी वकिलांना देऊन त्यांचे उत्तर मागितले आहे. ८ जानेवारी रोजी यावर पुढील सुनावणी होणार आहे.
लष्करावर थेट हल्ले
ईमान मजारी यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी खैबर-पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमधील 'बेपत्ता' नागरिकांच्या प्रकरणांसाठी सुरक्षा दलांना जबाबदार धरले. त्यांच्या पोस्ट या दहशतवादी संघटनांच्या विचारसरणीशी मिळत्याजुळत्या असल्याचा दावा पाकिस्तानी यंत्रणांनी केला आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्येही त्यांनी एका रॅलीत भाषण करताना लष्कराच्या काही विभागांना थेट 'दहशतवादी' संबोधले होते, त्यानंतर त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
कोण आहे ही 'लेडी' वकील?
ईमान मजारी या पाकिस्तानच्या माजी मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांच्या कन्या आहेत. शिरीन मजारी या इम्रान खान यांच्या सरकारमध्ये मंत्री होत्या. ईमान यांनी एडिनबर्ग लॉ स्कूलमधून शिक्षण घेतले असून त्या मानवाधिकार विषयातील तज्ज्ञ आहेत. अल्पसंख्याक आणि लष्करी छळाला बळी पडलेल्या नागरिकांच्या न्यायासाठी त्या सातत्याने लष्कराशी भिडत असतात. आज पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्यापेक्षाही या तरुण वकिलाच्या आक्रमक पवित्र्याची जास्त चर्चा होत आहे.
Web Summary : Pakistani lawyer Emaan Mazari, accused of anti-army posts, demands the military spokesperson testify in court. She is challenging alleged 'treason' accusations after criticizing the army's actions in human rights cases. The court is considering her request.
Web Summary : पाकिस्तानी वकील ईमान मज़ारी, जिन पर सेना विरोधी पोस्ट का आरोप है, ने सैन्य प्रवक्ता को अदालत में गवाही देने की मांग की। वह मानवाधिकार मामलों में सेना की कार्रवाई की आलोचना के बाद 'देशद्रोह' के आरोपों को चुनौती दे रही हैं। अदालत उनके अनुरोध पर विचार कर रही है।